ठळक बातम्या

एसटी कर्मचारी संपाच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच * संप मागे घ्या; सकारात्मक निर्णय घेईल – अनिल परबांचे आवाहन

मुंबई – एसटी कर्मचाऱ्यांनी संप लवकरात लवकर मागे घ्यावा, सरकार कुठेही आडमुठेपणाची भूमिका घेत नाही. उच्च न्यायालयाचा जो काही अहवाल असेल, त्यावर सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे. कोणाच्या तरी सांगण्यावरून, भडकवण्यावरून एसटी कर्मचाऱ्यांनी स्वत:चे नुकसान करून घेऊ नये, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.शनिवारी एसटी संघटनेचे पदाधिकारी गुजर आणि ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी अनिल परब यांची भेट घेऊन एसटी कामगारांच्या प्रश्नांवर त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी कोणताही तोडगा निघू शकला नाही. यावर लवकरच चर्चा करू असे परबांनी म्हटले आहे.

उच्च न्यायालयाने एसटीच्या विलिनीकरणासंदर्भात एक समिती नेमली आहे. समितीने यावर १२ आठवड्यांत अहवाल द्यायचा आहे. तुम्ही वकील आहात. तुम्हाला कायदेशीर प्रक्रिया माहीत आहे. कोर्टाने जी समिती स्थापन केली. तिला पूर्ण अधिकार दिले आहे. अभ्यास करून अहवाल सादर करावा. कोर्टाने निर्णय दिलेले असताना त्यात फेरफार करता येणार नाही. त्या अहवालावर राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असे अनिल परब म्हणाले. यावेळी एसटी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ॲडव्होकेट जनरलशी बोलून घ्या असे सांगितले. ॲडव्होकेट जनरल यांनाही या संपाची माहिती आहे. मी महाधिवक्त्याशी बोलेन पण तुम्ही संप मागे घ्या. कारण लोकांची अडवणूक होते, त्यांना त्रास होत आहे. विलिनीकरणाची प्रक्रिया एक-दोन दिवसांत होत नाही. त्यासाठी कमिटीला योग्य तो वेळ दिला आहे. त्या वेळेतच काम होईल. त्या व्यतिरिक्त काही मुद्दे असतील तर चर्चा करायला तयार आहे, असे मी त्यांना सांगितले, असे त्यांनी स्पष्ट केले.
मागील दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी एसटी महामंडळ आणि सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. एसटी संपावर मार्ग काढण्यासाठी मुंबई सेंट्रल येथील महामंडळाच्या मुख्यालयात परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीला महाराष्ट्र राज्य कनिष्ठ श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर, कर्मचारी संघटनेच्यावतीने हायकोर्टात बाजू मांडणारे ॲड. गुणरत्न सदावर्ते हेदेखील उपस्थित होते, तर भाजप आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांना बैठकीचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. विलिनीकरणाबाबत सरकार सकारात्मक वाटत असल्याचे ॲड. सदावर्ते यांनी म्हटले. विलिनीकरणाबाबत परिवहन मंत्री अनिल परब महाधिवक्त्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती ॲड. सदावर्ते यांनी दिली.

 
आझाद मैदानावरील एसटी कर्मचारी आक्रमक

एसटीचे शासनामध्ये विलिनीकरण करावे या मागणीसाठी गेल्या १३ दिवसांपासून आंदोलन करणारे एसटी कर्मचारी आता आक्रमक झालेले असून, ते राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर मोर्चा काढण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. परबांच्या घरावर मोर्चा काढणाऱ्या या मोर्चेकऱ्यांना सध्या आझाद मैदानावरच अडवण्यात आले आहे. दरम्यान, अनिल परब यांच्या सरकारी निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. आझाद मैदानावरील आंदोलकांनी राज्य सरकार विरोधात मोठी घोषणाबाजी सुरू केली आहे. सरकार आंदोलकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असून, आम्ही परबांच्या घरावर मोर्चा काढण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे आमदार गोपीचंद पडळकरांनी सांगितले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …