मुंबई – एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण व्हावे, या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. एसटीच्या विलिनीकरणाची मागणी भाजप नेत्यांकडून होत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सूचक वक्तव्य केले आहे. कामगारांच्या अडचणी आणि विलिनीकरण याच्यातला मध्यम मार्ग सुचवला असून, सरकारने निर्णय घ्यावा असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे एसटीचे विलिनीकरण सध्या तरी अशक्य असल्याचे म्हटले जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमासाठी नाशिक येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
काही दिवसांपूर्वीच एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते. ही बैठकही कोणत्याही निर्णयाविना संपली होती. एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत फडणवीस यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, एसटी कर्मचाऱ्यांबाबतची राज्य सरकारची भूमिका जीवघेणी आहे. कामगारांच्या अडचणी आणि विलिनीकरण याच्यातला मध्यम मार्ग मी सुचवला आहे. आता निर्णय राज्य सरकारला घ्यायचा आहे, असे सांगत संपाचा तोडगा काढण्याची जबाबदारी सरकारवर टाकली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत परिवहन मंत्री अनिल परब यांना देवेंद्र फडणवीस यांनी संपावर तोडगा काढण्यासाठी एखाद्या विद्यार्थ्याला समजावून सांगावे, तसे कागद पेन घेऊन समजावून सांगितले असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. प्रवासी कर कमी केल्यास सरकारकडून फक्त १०० कोटी घ्यावे लागतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी परब यांना सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी तुम्ही बोलून घ्या, आम्हीदेखील बोलून घेऊ असेही देवेंद्र यांनी अनिल परब यांना म्हटले.