जवळपास ५० टक्के भाजीपाला खराब होण्याची शक्यता
नवी मुंबई – अवकाळी पाऊस थांबला असला तरी या पावसाचा शेतीला मोठा फटका बसला आहे. भाज्या, फळे, धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतात पडून राहिलेला माल शेतकऱ्यांनी तोडणी करून पाठवल्याने मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात शेतमाल येऊन पडला आहे. नियमित सरासरी ६०० गाडी आवक भाजीपाला बाजारात येतो. मात्र मंगळवारी अंदाजे ८०० गाडी आवक भाजीपाला बाजारात आला. परिणामी भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली.
एरव्ही भाव खाऊन जाणारा हिरवा वाटाणा सकाळी ४० रुपये प्रतिकिलो विकला जात होता, मात्र दुपारपर्यंत २४ रुपये प्रतिकिलो दराने व्यापाऱ्यांना विकावा लागला. शिवाय इतर भाजीपाला १० ते २० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. भाजीपाला बाजारातील जवळपास ५० टक्के शेतमाल पडून असल्याने भाजीपाला खराब होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. अवकाळी पावसाचा परिणाम आणखी काही दिवस राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे तर आणखी काही दिवस भाजीपाला दर स्थिर राहतील, असे सांगण्यात येत आहे. पावसाने शेतमाल खराब होऊन शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, दर कमी मिळत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
सध्या वाटाण्याचा हंगाम सुरू असून मोठ्या प्रमाणात वाटाणा बाजारात येत आहे. मात्र, वाटण्याला चांगला दर मिळत नसल्याचे व्यापारी सांगतात. त्यामुळे इतर भाज्यांचे दर देखील कमी झाले आहेत. किरकोळ बाजारावर नियंत्रण नसल्याने त्या ठिकाणी भरमसाठ अधिक दराने भाजीपाल्याची विक्री होत आहे. मुंबई भाजीपाला बाजारातील भाज्यांचे दर वाटाणा २४ ते ४०, फ्लॉवर १०, भेंडी २०, गाजर १०, शिमला २०, टोमॅटो ३०, मिरची २०, कोबी १२, दुधी १०, वांगी १०, कारली १० रुपये प्रतिकिलो तर कोथिंबीर ५ आणि मेथी ५ रुपये जुडी होती.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …