उल्हासनगर – दोन वर्षांपूर्वी एका इलेक्ट्रॉनिक व्यापाºयाला ५ लाख रुपयांची खंडणी मागणाºया व खंडणीची रकम दिली नाही, तर शूट करण्याची धमकी देणाºया फरार आरोपीच्या मुसक्या विठ्ठलवाडी पोलिसांनी आवळल्या आहेत.
उल्हासनगरात कॅम्प नंबर ४ च्या बाजारपेठेत कॅनरा बँकेसमोर सुप्रसिद्ध लक्ष्मी इलेक्ट्रॉनिक दुकान आहे. १६ जून २०१९ रोजी महेश नेपाळी हा दुकानात गेला. दुकानातील कामगाराला सुनील सेठ कुठे आहे अशी विचारणा केली. कामगाराने माहीत नाही असे सांगताच महेशने स्वत:चा मोबाइल नंबर कामगाराला दिला. सेठला ५ लाख रुपये खंडणी देण्यास सांग नाहीतर शूट करणार, अशी धमकी दिली होती. याप्रकरणी दुकानाचे मालक सुनील तलरेजा यांनी थेट विठ्ठलवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केल्यावर नेपाळीने थेट नेपाळमध्ये पलायन केले होते.
दोन वर्षे झालीत पोलीस विसरून गेले असणार, या विचाराने परवा मंगळवारी महेश नेपाळी पुन्हा उल्हासनगरात आला. याची खबर बातमीदाराकडून मिळताच पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठलवाडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, गुन्हे डिटेक्शन पथकाचे उपनिरीक्षक हर्षल राजपूत, पथकातील सुजित निचिते, निलेश तायडे, हरिश्चंद्र घाणे, हरेश्वर चव्हाण, मंगेश वीर, समीर गायकवाड, हनुमंत सानप यांनी नेताजी भागात सापळा रचून खंडणी प्रकरणात दोन वर्षांपासून मोस्ट वॉन्टेड असलेल्या महेश नेपाळीच्या मुसक्या आवळल्या.
कोणताही गंभीर गुन्हा दाखल झाल्यावर त्याचा उलगडा होतोच असे स्पष्ट करताना न्यायालयाने आरोपी नेपाळी याला २६ तारखेपर्यंत पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली.