उल्हासनगरच्या वीज मीटर रीडिंग एजन्सीविरुद्ध गुन्हा दाखल * महावितरणचे तीन लाख ९२ हजारांचे नुकसान

कल्याण – मीटर रिडींग एजन्सीने ग्राहकांच्या वीज वापराची कमी नोंद दाखवून महावितरणचे तीन लाख ९२ हजारांचे नुकसान केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उल्हासनगर एक विभागात करार पद्धतीने कार्यरत शिवशक्ती संगणक कुशल सहकारी संस्था ही मीटर रीडिंग एजन्सी, एजन्सीचा कामगार सचिन मारुती चौधरी (शिव हरे कृष्णा अपार्टमेंट, शिव गंगानगर, बालाजी मंदिराजवळ, अंबरनाथ पश्चिम) आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ही लबाडी केली. त्यांच्याविरुद्ध उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात विविध 11 कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
महावितरणच्या उल्हासनगर एक उपविभागांतर्गत वीज ग्राहकांच्या मीटर रीडिंगचे काम शिवशक्ती संगणक कुशल संस्थेला निविदा प्रक्रियेतून करार पद्धतीने देण्यात आले आहे. मात्र या एजन्सीचे काम समाधानकारक नसल्याचे आढळून आले व ग्राहकांच्याही तशा तक्रारी आल्या. यावर उल्हासनगर तीन उपविभागात पीसी ०६ वरील ग्राहकांचे सदर एजन्सीने सप्टेंबरमध्ये घेतलेल्या मीटर रीडिंगची नवीन एजन्सीकडून ऑक्टोबरमध्ये पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत १६ ग्राहकांच्या मीटर रीडिंगमध्ये अविश्वसनीय अशी मोठी तफावत आढळली. वीज वापर अधिक असतानाही स्वयंचलित वीजबिल प्रणालीत या १६ ग्राहकांचा वीज वापर खूप कमी नोंदवून एजन्सीने महावितरणचे ३ लाख ९२ हजार रुपयांचे नुकसान केल्याची गंभीर बाब उघड झाली. शिवशक्ती संगणक कुशल संस्था, संस्थेचा कर्मचारी सचिन चौधरी व त्याच्या सहकाऱ्यांनी संगनमताने आर्थिक लोभापोटी वीज ग्राहकांच्या मीटर रीडिंगमध्ये जाणीवपूर्वक फेरफार करून महावितरणच्या महसुलाचे नुकसान व कराराचा भंग केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार वित्त व लेखा विभागाचे उपव्यवस्थापक किशोर हरी जाधव यांनी फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून उल्हासनगर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक उपनिरीक्षक सुरेश लोटे करत आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …