उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका दिवाळीनंतरच

नाशिक – राज्यात पुन्हा एकदा हवामान बदल जाणवत असून, उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका दिवाळीनंतर वाढण्याची शक्यता आहे, तर दक्षिण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

खरे तर दोन दिवसांपूर्वी उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला होता. ३० ऑक्टोबर रोजी नाशिकचे तापमान १२.८ पर्यंत खाली आले, तर जळगावमध्ये राज्यात सर्वात निचांकी १२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यापूर्वी २३ ऑक्टोबर रोजीही नाशिकमध्ये राज्यात निचांकी अशा १४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे ऐन दिवाळीत थंडी वाढणार, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. अनेकांनी वर्षभरापासून बांधून ठेवलेले स्वेटर, कानटोप्या, जॅकेट बाहेर काढले होते; मात्र आता अचानक हवामान बदल जाणवायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका कमीच राहणार आहे. नाशिकसह या भागात ९ नोव्हेंबरनंतर थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे दक्षिण महाराष्ट्रासह संपूर्ण दक्षिण भारतात सध्या ऐन दिवाळीत पाऊस हजेरी लावण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली. सध्या बंगालचा उपसागर आणि तामिळनाडूच्या किनाऱ्याजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. ते पश्चिमकडे सरकल्याने पावसाचा अंदाज आहे. या काळात कोकण, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगलीतही तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …