उत्तर भारतात हुडहुडी वाढली

  • राजस्थानमध्ये उणे १.१ तापमानाची नोंद
  •  महाराष्ट्रही गारठण्याच्या दिशेने

नवी दिल्ली – सध्या देशभरात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. देशाच्या राजधानीत सुद्धा हुडहुडी वाढली आहे. शनिवारी दिल्लीतील तापमान हे ६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते, तर रविवारी सकाळी हवामान विभागाच्या वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत ४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर कमाल तापमान हे १८ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली. राष्ट्रीय राजधानीत निरभ्र आकाश आणि थंड वारे वाहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राजस्थानमधील चुरुमध्ये उणे १.१ तापमानाची नोंद झाली आहे. तेथील काही ठिकाणी चक्क बर्फदेखील पडला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत थंडीने शिरकाव केला असून, हुडहुडी भरू लागली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये शनिवार हा हंगामातील पहिला ‘थंड दिवस’ ​​होता. वायव्य वाऱ्यांमुळे शहरात किमान तापमान ६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. कमाल तापमान १७.८ अंश सेल्सिअस नोंदवले होते. जे सामान्यपेक्षा पाच अंशांनी कमी आणि हंगामातील सर्वात कमी तापमान आहे. जेव्हा किमान तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी असते आणि कमाल तापमान सामान्यपेक्षा किमान ४.५ अंश सेल्सिअसने कमी नोंदवले जाते, तेव्हा तो थंड दिवस ​​असल्याचे म्हटले जाते. दिल्लीत हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) हा रविवारी सकाळी ९ वाजता २७४ वर होता, जो खराब श्रेणीत येतो. फरीदाबादमध्ये २३४, गाझियाबादमध्ये २२४, ग्रेटर नोएडामध्ये १७७, गुरुग्राममध्ये २१४ आणि नोएडामध्ये २०४ हवा गुणवत्ता निर्देशांक होता. शून्य ते ५० मधील एक्यूआय ‘चांगले’ म्हणून, ५१ आणि १०० ‘समाधानकारक’, १०१ आणि २०० ‘मध्यम’, २०१ आणि ३०० ‘खराब’, ३०१ आणि ४०० ‘अत्यंत खराब’ आणि ४०१ आणि ५०० ​​दरम्यान ‘एव्हर’ मानला जातो. दरम्यान, सफदरजंगमध्ये रविवारी सकाळी दाट धुक्यामुळे दृश्यमानता १८०० मीटरवर नोंदवण्यात आली आहे. याशिवाय डोंगरावरील बर्फवृष्टीचा परिणाम अनेक राज्यांवर होत आहे. उत्तर प्रदेशातही कडाक्याची थंडी आहे. त्याचबरोबर पंजाब, हरियाणा, बिहारमध्येही थंडी वाढली आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, दिल्लीत थंडीची लाट पाहता यलो ॲलर्ट ३ दिवस कायम राहणार आहे.
महाराष्ट्रात परभणी, हिंगोली, वाशिम जिल्ह्यांत तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. हिंगोली जिल्ह्यातील तापमानात प्रचंड घट झाली आहे. परिणामी जिल्हाभरात थंडीची लाट पसरली आहे. दिवसभर वातावरण थंड असून, थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक उबदार कपडे वापरत आहेत. परभणी जिल्ह्यातील तापमान १० अंशापर्यंत खाली आहे. त्यामुळे नागरिक ठिकठिकाणी शेकोटी पेटवून ऊब घेताना दिसत आहेत. वाशिममध्येही गेल्या काही आठवड्यांपासून गायब झालेल्या थंडीने परत जोर धरला आहे. वाशिम जिल्ह्यात १४ डिग्री सेल्सिअसपर्यंत पारा खाली घसरला आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …