अनेक मुली जखमी
बरेली – उत्तर प्रदेशात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत. अशात काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीही ‘लडकी हूँ, लड सकती हूँ’ ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत बरेतील मुलींसाठी एका खास मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. देशावर कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही आयोजकांच्या वतीने हजारो मुलींचा या स्पर्धेत समावेश करण्यात आलेला. दरम्यान, कमकुवत नियोजनाचा अभाव या स्पर्धेदरम्यान दिसला, ज्यामुळे स्पर्धा सुरू झाल्यानंतर चेंगराचेंगरीचे दृष्य पाहण्यास मिळाले. सुदैवाने तातडीने हालचाली केल्यामुळे मोठी हानी टाळली गेली, पण यात अनेक मुली जखमी झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बरेलीत बिशप मंडल इंटर कॉलेजातील मैदानावर सकाळी १० वाजता धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रियंका गांधी यांच्या ‘लडकी हूँ, लड सकती हूँ’ या मोहिमेंतर्गत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, मात्र स्पर्धा सुरू होताच काही वेळात एका मुलीचा दुसऱ्या आणि दुसऱ्या मुलीचा तिसरीला धक्का बसला. त्यामुळे पहिल्या रांगेतील अनेक मुली खाली पडल्या. त्यानंतर पाठीमागून आलेल्या मुलींचा लोंढा या मुलींवर कोसळून चेंगराचेंगरी झाली. मुली एकमेकींवर आदळल्यानंतर प्रचंड घाबरल्या होत्या. या मुलींनी एकच आरडाओरड सुरू केली. वाचवा वाचवाचा टाहो फोडला. या घटनेत अनेक मुली जखमी झाल्या आहेत, मात्र सुदैवाने कोणतीही मोठी दुर्दैवी घटना घडली नाही. या चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या तीन मुलींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, या घटनेनंतर काँग्रेसचे नेते आणि माजी महापौर सुप्रिया ऐरन यांनी वादग्रस्त विधान केले आहे. वैष्णोदेवीच्या मंदिरात चेंगराचेंगरी होऊ शकते, ही तर मुलींची गर्दी आहे. ही मानवी दुर्घटना आहे, मात्र मीडियातील लोकांना झालेल्या धक्काबुक्कीबद्दल मी दिलगीर आहे, असे विधान ऐरन यांनी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे, मात्र या घटनेमागे काही षड्यंत्र असू शकते. काँग्रेसचा जनाधार वाढत असल्याने हे षड्यंत्र रचले गेले असावे, असा दावा त्यांनी केला.