उत्तर प्रदेशातील पिलीभीतमध्ये सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीची हत्या

उसाच्या शेतात मृतदेह फेकला, पोलिसांकडून प्रियकराला बेड्या
लखनऊ – उत्तर प्रदेशमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. राज्यातील पिलीभीतमध्ये उसाच्या शेतात एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवल्यानंतर या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे, तर दुसरीकडे पोलिसांनी तरुणीच्या प्रियकराला अटक केली आहे. पोलीस प्रेम प्रकरणाचा अँगल डोळ्यासमोर ठेवून तपास करीत आहेत.
ही काळीज पिळवटून टाकणारी घटना पिलीभीतमधील बारखेडा भागातील आहे. १६ वर्षांची मुलगी १३ नोव्हेंबर रोजी (शनिवारी) शिकवणी वर्ग आणि महाविद्यालयात गेली होती. नेहमीप्रमाणे ती दुपारपर्यंत घरी परत यायची. मात्र सायंकाळपर्यंत ती घरी परतली नाही, अशी माहिती मृत मुलीच्या वडिलांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला.
अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी सांगितले की, त्यांनी मुलीचा शोध घेतला असता गावातील शेतात तिचा विवस्त्रावस्थेतील मृतदेह आढळून आला. शरीरावर खोल जखमेच्या खुणा होत्या. घटनास्थळी मुलीची पुस्तके आणि बॅग पडलेली होती. तसेच चार रिकाम्या बिअरच्या बाटल्या होत्या. अशा स्थितीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. आरोपीने बलात्कारानंतर खून केल्याच्या चर्चा परिसरात होत आहेत.
अल्पवयीन मुलीचा मृतदेह उसाच्या शेतात सापडला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी चार पथके तयार करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा लवकरच सविस्तर उलगडा होईल, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दिनेश कुमार यांनी दिली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …