१०० कोटी वसुली प्रकरण
७ हजार पानांच्या चार्जशीटमध्ये दोन्ही मुलांची नावे
मुंबई- १०० कोटींच्या वसुली प्रकरणाची चौकशी करणाºया अंमलबजावणी संचालनालयाने बुधवारी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले. कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीचे हे दुसरे आरोपपत्र आहे. ७ हजार पानांच्या या आरोपपत्रात अनिल देशमुख यांच्यासह त्यांची दोन मुले ऋषिकेश आणि सलील देशमुख यांचीही नावे आहेत. देशमुख यांना ईडीच्या पथकाने २ नोव्हेंबरला अटक केली होती, तर त्यांचे स्वीय सचिव संजीव पालांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांना जूनमध्ये अटक करण्यात आली होती. आरोपपत्रात अनिल देशमुख यांना मुख्य आरोपी करण्यात आले आहे.
या दोघांविरुद्ध २४ आॅगस्ट रोजी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणीचा आरोप केला होता.
हे प्रकरण मनी लाँड्रिंग आणि खंडणीच्या आरोपांशी संबंधित आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना, सचिन वाझे यांच्याकडे दरमहा १०० कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप केला होता.
याप्रकरणी सीबीआयने अनिल देशमुख यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला होता. सीबीआय एफआयआरच्या आधारे ईडीने कारवाई केली आहे. देशमुख महाराष्ट्राचे गृहमंत्री असताना, त्यांनी बार आणि रेस्टॉरंटच्या मालकांकडून ४.७ कोटी रुपये वसूल केले होते. ही रक्कम डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत वसूल करण्यात आली होती आणि ही रक्कम मुंबई पोलिसांचे सहाय्यक निरीक्षक सचिन वाझेमार्फत वसूल करण्यात आली.
ईडीच्या म्हणण्यानुसार, या रकमेपैकी ४.१८ कोटी रुपये दिल्लीतील ४ वेगवेगळ्या शेल कंपन्यांमध्ये जमा करण्यात आले होते. या कंपन्यांनी ही रक्कम श्री साई शिक्षण संस्थान नावाच्या ट्रस्टला दिली. ही ट्रस्ट अनिल देशमुख आणि त्यांचे कुटुंब चालवतात, म्हणजेच वसुलीचा पैसा शेल कंपन्यांच्या माध्यमातून देशमुख यांच्या ट्रस्टवरच वापरला गेला.
देशमुख यांनी पत्नी आरती देशमुख यांच्या नावे मुंबईतील वरळी येथे फ्लॅट खरेदी केला होता. हा फ्लॅट २००४ मध्ये रोख पैसे देऊन खरेदी करण्यात आला होता, परंतु फेब्रुवारी २०२० मध्ये विक्री करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. जेव्हा अनिल देशमुख महाराष्ट्राचे गृहमंत्री होते. ईडी या प्रकरणाचाही तपास करत आहे.
प्रीमियर पोर्ट लिंक्स या कंपनीत देशमुख कुटुंबाची ५० टक्के हिस्सेदारी आहे. ही हिस्सेदारी १७.९५ लाख रुपयांना विकत घेण्यात आली, तर कंपनी आणि तिची उर्वरित मालमत्ता ५.३४ कोटी रुपये आहे. याप्रकरणी देखील ईडी तपास करत आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …