चित्रपटांमध्ये दाखवण्यात येणाऱ्या दृश्यांच्या बाबतीत मेकर्स आजकाल जरा जास्तच जागरूक झाले आहेत. कोणत्या सीनवर बवाल होईल, याची धास्ती त्यांना सतत वाटत असते, परंतु हॉलीवूड चित्रपट त्याबाबतीत अपवाद आहेत. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या इंटर्नल्सबद्दल म्हणूनच सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे.
मुळात या चित्रपटात हॉलीवूड स्टार रिचर्ड मॅडनची व्यक्तिरेखा इकारिसो आणि जेमा चेन साकारत असलेल्या सेर्सी यांच्यात एक रोमँटिक सीन दाखवण्यात आला आहे. चित्रपटात इकारिसो आणि सेर्सी यांचा हिंदू पद्धतीने विवाह होताना दाखवण्यात आला आहे. भारतीय प्रेक्षकांना खूश करण्यासाठी या चित्रपटात या जोडप्याला सात फेरे घेताना दाखविण्यात आले आहे खरे, परंतु हिंदू विवाह सोहळ्यात घरातील मोठ्या व्यक्तींसमोर रोमान्स केला जात नाही, याचा विसर मात्र फिल्ममेकरला पडला असावा. या सीनमध्ये हे जोडपे विवाहानंतर एकमेकांना किस करताना दाखवण्यात आले आहे आणि ही गोष्ट भारतीय प्रेक्षकांना काही रुचलेली नाहीयं. या सीनबद्दल सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. लोक आपला राग स्पष्टपणे व्यक्त करताना दिसून येत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, ही हिंदू नव्हे, तर ख्रिश्चन पद्धत आहे. आमच्यात असे किस केले जात नाही. त्यामुळे या चित्रपटाला चांगलेच ट्रोल केले जात असून, या चित्रपटावर भारतात बंदी आणावी, अशी मागणीही केली जात आहे.