इंधन दरवाढ ही आपल्या भल्यासाठीच – मुख्यमंत्र्यांचा केंद्राला टोला

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी एमएमआरडीएच्या सर्वकष परिवहन अभ्यास अहवालाचे लोकार्पण केले. यावेळी त्यांनी इंधन दरवाढीवरून मोदी सरकारला उपहासात्मक शैलीत टोले हाणले. आपण टीका करतो की, पेट्रोल-डिझेलचे दर वाढले. खरं म्हणजे हे तसं नाही. हे आपल्या भल्यासाठी होतेय. सार्वजनिक वाहतुकीतील प्रवाशांचा टक्का घसरत असून, खासगी वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे आणि ही संख्या कमी झाली, तरच सार्वजनिक वाहतुकीतील प्रवाशांचा टक्का वाढू शकतो, हे आता केंद्र सरकारच्या लक्षात आले आहे, म्हणून तर देशात एका चांगल्या हेतूने इंधन दरवाढ होत आहे; पण हे आपण लक्षातच घेत नाही, असा उपहासात्मक टोला मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मुंबईत त्यावेळी ट्राम्स चालत होत्या. पुण्यात घोडागाड्या होत्या. त्यातून फिरणे ही एक गंमत असायची. मी लोकल आणि बेस्ट बसेसमधूनही प्रवास केलेला आहे. बाहेरच्या देशात ज्या सुविधा आहेत, त्या अनेक वर्षांपासून आहेत. त्या आपण आता आणत आहोत, असे सांगतानाच मुख्यमंत्र्यांनी मिश्किल शैलीत मुंबईतली सार्वजनिक वाहतुकीची परिस्थिती स्पष्ट केली.
मुख्यमंत्री म्हणाले की, आपल्याकडे ऑटोमॅटिक लोकल सेवा आधीच होती. ती जगात कुणाकडेही नाही. ऑटोमॅटिक लोकल सेवा म्हणजे प्रवासी रेल्वे स्थानकात उभा राहिल्यानंतर तो आपोआपच लोकलमध्ये ढकलला जातो आणि बाहेरही आपोआप फेकला जातो. ही सेवा जगात कुठेच नाही, असेही ते म्हणाले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …