इंधन दरवाढ मोजक्या उद्योगपतींच्या फायद्यासाठीच – राहुल गांधींचा आरोप

*  भाजपवर द्वेषाच्या राजकारणाचा आरोप
पणजी – आगामी गोवा विधानसभा निवडणूकीसाठी प्रचाराचे रणशिंग फुंकत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी भाजपवर कडाडून हल्ला चढवला. इंधन दरवाढीच्या माध्यमातून फक्त काही मोजक्या उद्योगपतींचे घर भरले जात आहे, अशी टीका करत राहुल गांधी यांनी भाजपची विचारधारा द्वेषावर आधारित असल्याचा आरोप लावला. भाजपकडून देशात द्वेष आणि विभाजनवादी विचारांचे राजकारण केले जात आहे. परंतू काँग्रेसकडून त्याला प्रेम आणि आपुलकीने प्रत्युत्तर दिले जाईल, असे राहुल गांधी म्हणाले.

तत्कालीन काँगेस नेतृत्वाखाली युपीए सरकारमध्ये कच्चा तेलाच्या किंमती आताच्या तुलनेत खूप अधिक महाग म्हणजे १४० डॉलर प्रति बॅरेल होत्या. त्यावेळी देखील इंधनाचे दर गगनाला भिडले नव्हते. पण सद्यस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत तुलनेने कमी असताना देखील लोकांच्या खिशावर डल्ला मारला जात आहे. आजघडीला जगात इंधनावर सर्वाधिक कर वसुली भारतात केली जात असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. काळजीपूर्वक लक्ष दिल्यास सरकार फक्त मोजक्या उद्योगपतीच्या भल्यासाठी इंधनाचे दर वाढवत असल्याचे दिसून येईल, असा आरोप त्यांनी लावला. दक्षिण गोव्याच्या एक दिवसीय दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी मच्छिमार समुदायाला संबोधित करताना भाजप व काँग्रेसच्या विचारधारेमधला फरक आधोरेखित केला. भाजपची विचारधारा ही द्वेष आणि लोकांमध्ये फुट पाडणारी आहे. काँग्रेसचा विश्वास हा लोकांना एकत्र करत पुढे घेउन जाण्यावर आहे. भाजपच्या द्वेषाच्या राजकारणाला प्रेम आणि स्नेहभावाने उत्तर दिले जाईल. आपल्या पक्षासाठी प्रत्येक भारतीयाची मोकळीक महत्वाची आहे, असे ते म्हणाले. त्याचबरोबर घोषणापत्रामध्ये दिले जाणारे आश्वासन ही फक्त कटिबद्घता नसून शंभर टक्के हमी दर्शवणारे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माझ्यासाठी माझे उत्तरदायित्व खूप महत्वाचे आहे. मी शब्द देउन पाठ फिरवणाऱ्या इतर नेत्यांप्रमाणे नाही. जर मी राज्यात कोळसा खाणीला विरोध करत असेल तर ते पूर्णपणे ताकदीने करेल. अन्यथा उद्या माझ्या शब्दाला किंमत राहणार नाही, असे राहुल म्हणाले. विशेष म्हणजे दक्षिण गोव्यातील मच्छिमार समुदायाकडून दक्षिण पश्चिम रेल्वेच्या दुहेरीकरणाला विरोध केला जात आहे. जर हे दुहेरीकरण झाले तर राज्याचे रुपांतर कोळसा खाणीत होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. मच्छिमारांच्या विरोधाला समर्थन दर्शवत राहुल गांधी यांनी इतर काँग्रेस शासित राज्यातील विकासाकामांचा पाढा वाचला. उल्लेखनीय म्हणजे पुढच्या वर्षाच्या सुरूवातीला गोव्यात विधानसभा निवडणूक रंगणार असल्याने पश्चिम बंगालमधील ममतांच्या तृणमूलसह विविध पक्ष प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …