ठळक बातम्या

इंदिरा गांधींच्या काळात ‘नाही’ म्हणण्याची मुभा होती, पण आता काँग्रेसमध्ये – गुलाम नबी आझाद यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा!

नवी दिल्ली – दोन वर्षांपूर्वी जी-२३ नावाचा गट स्थापन करून त्यामध्ये काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी पक्षनेतृत्व आणि पक्षातील कार्यपद्धतीवर तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली होती. तसेच, राहुल गांधींच्या नेतृत्वावर देखील आक्षेप घेतला होता. याच जी-२३चे एक सदस्य असलेले जम्मू-काश्मीरमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आपल्याच पक्षावर परखड शब्दांत निशाणा साधला आहे. तसेच, नवा पक्ष स्थापन करण्याचा कोणताही विचार नाही, पण राजकारणात काय होईल, हे कुणीच सांगू शकत नाही, असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे काँग्रेसला आगामी काळात पक्षाच्याच ज्येष्ठ नेत्यांकडून धक्के बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

एकीकडे पक्षाचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल नेतृत्वावर टीका करण्यात अजिबात मागेपुढे पाहत नसताना आता गुलाम नबी आझाद यांनी देखील विरोधाचा शंख फुंकला आहे. जम्मू-काश्मीरमधील गुलाम नबी आझाद यांचे निष्ठावान असलेले काँग्रेसचे २० पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षाचा राजीनामा देणार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये नव्या पक्षाच्या स्थापनेची चर्चा जोरात सुरू झाली आहे. आझाद एका सभेत पुढे म्हणाले की, राजकारणात पुढे काय घडेल, हे कुणीही सांगू शकत नाही, जसे कुणीही हे सांगू शकत नाही की त्याचा मृत्यू कधी होणार आहे. राजकारणात कधीही काहीही घडू शकते, पण नवा पक्ष स्थापन करण्याचा कोणताही विचार नाही. माझी स्वत:ची राजकारण सोडण्याची इच्छा होती. पण लाखो समर्थकांसाठी मी काम करत राहिलो. दरम्यान, गुलाम नबी आझाद यांनी यावेळी बोलताना इंदिरा गांधी-राजीव गांधी आणि काँग्रेसचे आताचे नेतृत्व यांच्यात तुलना केली आहे. नेतृत्वाला कुणीही आव्हान देत नाही. इंदिरा गांधी आणि राजीव गांधींनी मला काही चुकीचे घडल्यास त्यावर प्रश्न विचारण्याची मोकळीक दिली होती. त्यांचा टीकेबाबत आक्षेप नसायचा. त्यांना यात अपमान नव्हता वाटत. काँग्रेसमध्ये नेतृत्वाला यात अपमान वाटतो, असे गुलाम नबी आझाद पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

One comment