लंडन – इंग्लंडचे माजी क्रिकेट कर्णधार आणि प्रशिक्षक रे इलिंगवर्थ यांचे वयाच्या ८९व्या वर्षी कर्करोगामुळे निधन झाले. यॉर्कशायर या इंग्लिश कौंटी संघाने याबाबत माहिती दिली. १९७०-७१ मध्ये इलिंगवर्थ यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने ऑस्ट्रेलियात मालिका विजयाची किमया साधली होती. इलिंगवर्थ यांनी १९५८ ते १९७३ या कालावधीत ६१ कसोटी सामन्यांत इंग्लंडचे प्रतिनिधित्व करताना २३.२४ च्या सरासरीने १,८३६ धावा केल्या आणि १२२ बळी घेतले. यापैकी ३१ सामन्यांत इंग्लंडचे नेतृत्व करताना १२ सामने जिंकून दिले आणि १४ सामने अनिर्णित राखले, तर पाच सामने गमावले. १९७१ मध्ये झालेल्या पहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात ते खेळले होते. १९९४ ते १९९६ या कालावधीत ते इंग्लंडच्या निवड समितीचे प्रमुख होते, तर १९९५-९६ मध्ये संघाचे त्यांनी प्रशिक्षकपद भूषवले होते.