ब्रिस्बेन – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिकेतील पहिला कसोटी सामन्यात रंगत चढत आहे.पहिल्या डावात १४७ धावांत घसगुंडी झालेल्या इंग्लंडनेतिसऱ्या दिवशी यजमान संघाला चोख प्रत्यूत्तर दिले आहे. इंग्लंडचा कर्णधार जो (नाबाद ८६) आणि डेव्हिड मलानच्या (नाबाद ) यांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद १५९ धावांची भागिदारी करत इंग्लंडला पुनरागमन करण्याची आशा दाखवली आहे. तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस इंग्लंडचा स्कोअर २ बाद २२० असा होता. यापूर्वी, ट्रेविस हेड ने १४८ चेंडूंत १५२ धावांची धडाकेबाज खेळीच्या जोरावर यजमान ऑस्ट्रेलियानेआपल्या पहिल्या डावात ४२५ धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे यजमानांने२७८ धावांची भक्कम आघाडी मिळवली. इंग्लंडची टीम अद्यापही ७८ धावांनी मागे आहे.
हसीब हमिद आणि रोरी बर्न्स यांनी दुसऱ्या डावात इंग्लंडला धिमी सुरुवात करून दिली, मात्र वेगवान गोलंदाज कर्णधार कमिन्सच्या चेंडूवर बर्न्स (१३) यष्टीरक्षक ॲलेक्स कॅरीकडे झेल देण्यास भाग पाडले.त्यानंतर स्टार्कनेही खेळपट्टीवर स्थिरावलेल्या हमिदला (२७) बाद केले.सलामी जोडी तंबूत परतल्यानंतर इंग्लंडची पहिल्या डावाची पुरावृत्ती होते की काय असे वाटत असतानाच रूट व मलान यांनी डावाची सूत्रेहातात घेत त्यांनी आणखी पडझड होऊ दिली नाही. अंतिम व तिसऱ्या सत्रात या दोघांनी ऑस्ट्रेलियाच्या थकलेल्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. रूट आणि मलाननेअर्धशतक झळकावले.दिवसाच्या अखेरपर्यंत इंग्लंडने सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात यश मिळवले. रूट व मलान यांनी तिसऱ्या गड्यासाठी १५९ धावांची अभेद्य भागीदारी रचली.तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस रुट नाबाद ८६, तर मलान ८० धावांवर नाबाद आहे.
यापूर्वी, आस्ट्रेलियानेतिसऱ्या दिवशी ७ बाद ३४३ धावांवरुन आपला डाव पुढे सुरू केला. ऑस्ट्रेलियाच्या अंतिम तीन फलंदाजांनी धावसंख्येत ८२ धावांची भर घातली. मिशेल स्टार्क (३५) सकाळच्या सत्रात बाद होणारा पहिला फलंदाज ठरला.स्टार्कने ५ चौकारांनिशी ३५ धावा काढत आठव्या गड्यासाठी हेड सोबत ८५ धावा जोडल्या. हेडने १४३ चेंडूंत दीड शतकाला गवसणी घातली. तळाचा फलंदाज नॅथन लियोनला (१५) हाताशी धरत हेडने ऑस्ट्रेलियाच्या चारशे धावा धावफलकावर लगावल्या.हेड बाद होणारा ऑस्ट्रेलियाचा अंतिम फलंदाज ठरला. त्याने १४८ चेंडूंत १४ चौकार व ४ षटकारांनिशी १५२ धावा फटकावल्या.हेडची कारकीर्दीतली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. इंग्लंडकडून ओली रॉबिन्सन आणि मार्क वूड या दुकलीने प्रत्येकी ३ बळी घेतले, तर ख्रिस वोक्सने दोन फलंदाजांना माघारी धाडले. जॅक लिच आणि कामचलाऊ गोलंदाज कर्णधार जो रूटला केवळ एका बळीवर समाधान मानावे लागले.
१९ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला
यावर्षीजबरदस्त फॉर्ममध्येअसलेल्या कर्णधार जो रूटने ऑस्ट्रेलियन बॉलर्सना कोणतीही संधी दिली नाही. रुट १५८ चेंडूंत नाबाद ८६ आहे. रूट एका कॅलेंडर वर्षात कसोटी मध्ये सर्वात जास्त धावा करणारा इंग्लंडचा फलंदाज बनला आहे. त्याने माजी कॅप्टन मायकल वॉनचा १९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. रूटने२०२१ मध्येआजवर १५४१ धावा काढल्या आहेत. त्याने शुक्रवारी तिसऱ्या सेशनध्ये१४८१ धावा करणाऱ्या वॉनला मागेटाकले. वॉनने२००२ साली हा विक्रम केला होता. रूटने या खेळीच्या दरम्यान स्टीव्ह स्मिथ (१४७४) आणि वीरेंद्र सेहवाग (१४६२) यांनाही मागे टाकले. एका कॅलेंडर वर्षात सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम पाकिस्तानच्या मोहम्मद युसूफच्या नावावर आहे. त्याने२००६ साली ११ कसोटीमध्ये १७८८ धावा काढल्या होत्या.