- महिला आयोगाकडून दखल
- महापौरांचे गृहमंत्र्यांना पत्र
मुंबई – शिवसेना आणि भाजपमधील आरोप-प्रत्यारोपाचा वाद आता थेट राज्य महिला आयोगापर्यंत पोहचला आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केले असून, त्याची दखल महिला आयोगाने घेतली आहे. यासंदर्भातील वस्तुस्थितीदर्शक अहवाल आयोगाला पाठवून देण्याचे निर्देश मुंबई पोलीस आयुक्तांना पत्राद्वारे दिले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुंबई पोलिसांना वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वरळी बीडीडी चाळ येथे मागील आठवड्यात मंगळवारी सिलिंडर स्फोट झाला होता. या स्फोटात एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले. या घटनास्थळाला मुंबईच्या महापौरांनी उशिरा भेट दिली होती. याबाबत टीका करताना मुंबईत झालेल्या सिलिंडर स्फोटानंतर ७२ तासांनी महापौर पोहोचतात. एवढे तास कुठे निजला होतात असा सवाल आमदार आशिष शेलार यांनी महापौरांना केला होता. महापौरांवर टीका करताना आशिष शेलार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे. दरम्यान, याबाबत महापौरांच्या तक्रारीची गंभीर दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. महिला लोकप्रतिनिधी संदर्भात केलेली कोणतीही अवमानकारक वक्तव्य अजिबात खपवून घेतली जाणार नाहीत. त्यामुळे राज्य महिला आयोगाने याची गंभीर दखल घेतली असून, यासंदर्भातील वस्तुस्थितीदर्शक अहवाल आयोगाला पाठवून देण्याचे निर्देश मुंबई पोलीस आयुक्तांना दिले असल्याची माहिती आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली, तसेच याप्रकरणी मुंबई पोलीस मुख्यालयात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने तक्रार दाखल करण्यासाठी मंगळवारी विश्वास नांगरे-पाटील यांची भेट घेतली. यावेळी विशाखा राऊत, शिवसेना उपनेत्या आणि मुंबई महिला विभाग प्रमुख मीना कांबळी उपस्थित होत्या.