आशियाई हॉकी चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

 उपांत्य फेरीत धडक * हरमनप्रीत-आकाशदीप ठरले विजयाचे हिरो
ढाका – बांगलादेशातील ढाका येथे सुरू असलेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताच्या पुरुष हॉकी संघाने पाकिस्तानवर दणदणीत विजयाची नोंद केली आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्यात हरमनप्रीत सिंग आणि आकाशदीप सिंग यांच्या गोलच्या बळावर भारताने पाकिस्तानवर ३-१ ने विजय मिळवला. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२१ च्या साखळी सामन्यात भारतीय हॉकी संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवून उपांत्य फेरीत धडक दिली. भारताकडून हरमनप्रीत सिंग आणि आकाशदीप सिंग हे विजयाचे हिरो ठरले. या सामन्यात भारतीय संघ सुरुवातीपासूनच आक्रमक खेळताना दिसला आणि त्याचा फायदाही संघाला झाला.
हरमनप्रीत सिंगने पहिल्या क्वार्टरमध्ये पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल करीत भारताला आघाडी मिळवून दिली. मात्र, सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला अर्शदीप सिंगला चुकीच्या टॅकलमुळे दोन मिनिटे मैदान सोडावे लागले होते. त्यामुळे दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताला २ मिनिटे १० खेळाडूंसह खेळावे लागले. याचा फायदा घेण्यासाठी पाकिस्तानने पलटवार केला. पण भारतीय खेळाडूंनी त्यांना रोखले. पहिल्या मध्यंतरापर्यंत भारताने १-० अशी आघाडी घेतली.
तिसऱ्या क्वार्टरमध्येही भारताचे वर्चस्व पाहायला मिळाले. ४१ व्या मिनिटाला पाकिस्तानच्या हमामुद्दीनला अंपायरने ग्रीन कार्ड दाखवले. त्यामुळे त्याला दोन मिनिटांसाठी मैदानाबाहेर जावे लागले. याचा भारताला फायदा झाला. आकाशदीप सिंगने ४२ व्या मिनिटाला रिव्हर्स फ्लिकद्वारे गोल केला. मात्र, तिसऱ्या क्वार्टरच्या शेवटच्या काही मिनिटांत पाकिस्तानने गोल करून पुनरागमन केले. तिसऱ्या मध्यंतराच्या अखेरीस भारत २-१ च्या फरकाने आघाडीवर होता.
चौथ्या क्वार्टरमध्ये पाकिस्तानला पेनल्टी कॉर्नरद्वारे बरोबरी साधण्याची संधी मिळाली. सामन्यादरम्यान चेंडू पाकिस्तानी खेळाडूच्या पायाला लागल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत होते. परंतु, चेंडू भारतीय खेळाडूच्या पायाला लागल्याचे मैदानावरील पंचांना वाटले. त्यामुळेच पंचांनी पाकिस्तानला पेनल्टी कॉर्नर दिला. परंतु, कर्णधार मनप्रीत सिंगच्या रेफरलमुळे पंचांना निर्णय बदलावा लागला. त्यानंतर भारताने आक्रमकपणे खेळण्यास सुरुवात केली आणि ५व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवर भारतासाठी तिसरा गोल केला. हा त्याचा सामन्यातील दुसरा गोल ठरला. नंतर पाकिस्तानने पुनरागमन करण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र त्याला यश मिळाले नाही.
या स्पर्धेतील तीन सामन्यांमधील सात गुणांसह भारतीय हॉकी संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. याआधी झालेल्या दोन सामन्यांत भारताची दक्षिण कोरिया विरुद्धची लढत २-२ अशी बरोबरीत सुटली होती. त्यानंतर भारताने बांगलादेशवर ९-० अशी एकतर्फी विजयाची नोंद केली होती. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतही भारताने कांस्य पदक विजेती कामगिरी केली होती. जागतिक क्रमवारीत भारतीय हॉकी संघ सध्या पाचव्या स्थानावर आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …