ठळक बातम्या

आव्हानात्मक परिस्थितीत इंग्लंडचा सामना करण्यास उतरणार बांगलादेश

अबुधाबी – गतविजेत्या वेस्ट इंडिजविरुद्ध प्रभावशाली विजय नोंदवत आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात करणाऱ्या इंग्लंड संघासमोर आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या सुपर-१२ मध्ये बांगलादेशचे आव्हान असेल. या सामन्यात इंग्लंडचे पारडं जड वाटत आहे; पण तसे असले, तरी बांगलादेश संघाला उपखंडीय परिस्थितीत खेळण्याचा अनुभव चांगला आहे.

कर्णधार इयोन मॉर्गनच्या नेतृत्वातील इंग्लंडने वेस्ट इंडिजला १४.२ षटकांत ५५ धावांत गारद करत अवघ्या ८.२ षटकांत विजय नोंदवला. दुपारी सुरू होणाऱ्या या सामन्यात सध्याच्या वनडे विश्वचषक विजेत्या संघाला अबुधाबीमधील कडक उन्हाचा त्रास सोसावा लागेल. येथील दमट वातावरणाचे तापमान ३२ डिग्री सेल्सियसच्या वर असू शकते. इंग्लंडसाठी चांगली बाब अशी की, अबुधाबीच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना अफाट फायदा मिळतो. अशात मॉर्गन एक फलंदाजाच्या जागी संघात मार्क वुडला समाविष्ट करू शकतो. या ठिकाणी आतापर्यंत झालेल्या चार सामन्यांपैकी तीनमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना संघ यशस्वी झाला आहे. इंग्लंडचा संघ स्पर्धेत बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि सॅम कुरेनसारख्या खेळाडूंशिवाय पोहचलेत; पण अष्टपैलू मोईन अलीने शानदार गोलंदाजी करत या त्रिकुटाची कमतरता जाणवू दिली नाही. वेस्ट इंडिजविरुद्ध मोईन अलीने पॉवर प्लेमध्ये दोन यश मिळवले व चार षटकांत एक निर्धाव षटकासह फक्त १७ धावा दिल्या. त्यामुळे पॉवर प्लेमध्ये वेस्ट इंडिजचा स्कोर ४ बाद ३३ धावा झालेला. त्यानंतरची कसर आदिल राशिदने २.२ षटकांत दोन धावा देत चार विकेटनं पूर्ण केली. बांगलादेश संघ या फॉरमेटमध्ये विश्वचषकातील आपल्या रेकॉर्डची सुधारणा करू पाहील. संघाला २००७ नंतर अतापर्यंत फक्त सात विजय मिळवता आलेत, ज्यात कसोटी खेळणाऱ्या देशांविरुद्ध (वेस्ट इंडिज) एकच विजय मिळवता आला. त्यांच्यासाठी येथील परिस्थितीचा फायदा घेणं गरजेचं आहे. संघ श्रीलंकाविरुद्ध मागील सामन्यात आपला दिग्गज अष्टपैलू शाकिब अल हसनचा पूर्ण वापर करू शकले नाहीत. या डावखुऱ्या गोलंदाजाने सुरुवातीला श्रीलंकेचे दोन फलंदाज माघारी धाडले, ज्यामुळे १० षटकांत त्यांची धावसंख्या चार बाद ७९ धावा झाली. तो जेव्हा पुन्हा गोलंदाजीस आला तोपर्यंत सामना बांगलादेशच्या हातून निसटला होता. इंग्लंडकडे एक बळकट फलंदाजी फळी आहे, पण त्यांचे पहिले फलंदाज वेस्ट इंडिजविरुद्ध अवघ्या ५६ धावांचा पाठलाग करताना अस्थिर वाटले. मुस्ताफिजुर रहमानच्या नेतृत्वातील बांगलादेशचा वेगवान गोलंदाजी चमू याचा फायदा घेऊ पाहतील. बांगलादेशकडे तस्कीन अहमद, मोहम्मद सैफुद्दीन व डावखुरा वेगवान गोलंदाज शोरफुल इस्लामासारखे वेगवान गोलंदाज आहेत. हा सामना दुपारी साडेतीन वाजता सुरू होईल.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …