हायकोर्टाच्या निरीक्षणामुळे समीर वानखेडे तोंडावर आपटले!
मुंबई – मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी अमली विरोधी पथकाने मोठा गाजावाजा करत सुपरस्टार शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खानला अटक केली होती, पण हायकोर्टाने त्याला जामीन मंजूर करून एनसीबीला पहिला धक्का दिला. आता आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्याकडे अमली पदार्थ सापडले नाही, असे निरीक्षण हायकोर्टाने नोंदवले आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांना मोठा धक्का बसला आहे.
हायकोर्टाने आर्यन खानला जामीन मंजूर केला होता. जामीन मंजूर करत असताना आर्यन खानच्या जामिनावर निकाल देताना मुंबई हायकोर्टाने नोंदवलेले महत्त्वपूर्ण निरीक्षण आता समोर आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एनडब्ल्यू सांबरे यांनी हे निरीक्षण नोंदवले आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्याकडे कमर्शिअल क्वांटिटीमध्ये अमली पदार्थ सापडलेत असे प्रथमदर्शनी तरी दिसत नाही. त्यांचा गुन्ह्यात सहभाग आहे हे या टप्प्यावर सांगणे कठीण आहे, असे कोर्टाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. तसेच, त्यांनी गुन्हेगारी षड्यंत्र रचले आहे, असे अनुमान काढण्यासाठी कोणतेही आधारभूत कारण सध्या तरी दिसत नाही, असेही कोर्टाने म्हटले आहे.
एनसीबीने आर्यन खानच्या फोनमधून घेतलेल्या व्हॉट्सअॅप चॅटचा दाखला देत तो कटात सहभागी असल्याचा दावा केला होता. पण या चॅटमध्ये आर्यन आणि अरबाज मर्चंट किंवा तिघांनीही इतर आरोपींसोबत एनसीबीने आरोप केल्यानुसार कोणताही कट रचला हे असे आक्षेपार्ह काहीही प्रथमदर्शनी तरी दिसत नाही, असेही निरीक्षण न्यायमूर्तींनी नोंदवले आहे.
आर्यन खानला २८ आॅक्टोबरला जामीन मिळाला होता. त्या जामिनाच्या आदेशाची प्रत आज जाहीर करण्यात आली आहे. हायकोर्टाच्या या निरीक्षणामुळे एनसीबीने केले सर्व आरोप हे एका प्रकारे खोटे ठरले आहे, त्यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह आहेत.