आरसीबीच्या मुख्य प्रशिक्षकपदी संजय बांगर

 

नवी दिल्ली – टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि भारतीय संघाचा माजी फलंदाज प्रशिक्षक संजय बांगर याची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलच्या आगामी सत्रासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. आरसीबीने ट्विटरवर याविषयी एक प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केले आहे.
बांगर यापूर्वी आरसीबीचा फलंदाजी सल्लागारही होता. यंदाच्या आयपीएल लीगमध्ये संघाचे क्रिकेट ऑपरेशन्सचे संचालक माईक हेसन यांनी संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावली होती. माईक हेसन यांच्याकडून त्याने प्रमुख प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारली. हेसन हे संघाचे क्रिकेट ऑपरेशन संचालक पद पूर्वीप्रमाणेच हाताळतील.

यापूर्वी विराट कोहलीने आरसीबीचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. पुढील वर्षापासून तो लीगमधील बंगळुरू संघाची कमान सांभाळणार नाही, मात्र या संघाकडून खेळत राहण्याची इच्छा त्याने व्यक्त केली आहे.
नियुक्तीनंतर बांगर याने प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले, याआधी बंगळुरू संघाचा फलंदाजीचा प्रशिक्षक होतो. आरसीबीचे पहिले आयपीएल विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न उराशी बाळगून मी या मैदानात उतरलो आहे. माझ्यापुढे मोठी आव्हाने उभी आहेत. एवढ्या मोठ्या फ्रँचायझीचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करण्याची ही एक सन्मानाची आणि अद्भूत संधी आहे. मी यापूर्वी संघातील काही अपवादात्मक आणि प्रतिभावान सदस्यांसोबत काम केले आहे आणि या संघाला पुढील स्तरावर नेण्यासाठी मी वाट पाहू शकत नाही. आयपीएल मेगा लिलावासाठी आमची तयारी सुरू झाली आहे, पण मला खात्री आहे की, संघाचे मालक, व्यवस्थापन तसेच सहाय्यकांकडून मिळणाऱ्या सहकार्यामुळे कामगिरी उंचावू आणि आगामी हंगामासाठी आम्ही आतापासूनच डावपेच आणि संघ बांधणीसाठी पावले उचलली आहेत. आम्ही एक मजबूत संघ तयार करण्याचा निर्धार केला आहे आणि आम्ही आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असा निर्धार त्याने व्यक्त केला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …