- विराटची सातव्या स्थानी घसरण
दुबई – भारतीय कर्णधार विराट कोहली आयसीसीच्या नव्या जागतिक क्रमवारी फलंदाजीच्या यादीत एक क्रमांकाच्या तोट्यासह सातव्या स्थानी सरकला, तर ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन ॲशेस मालिकेतील शानदार फॉर्मच्या जोरावर इंग्लंडचा कर्णधार जो रुटला मागे सारत जगातील अव्वल क्रमांकाचा फलंदाज बनला आहे.
भारताचा रोहित शर्मा पाचव्या स्थानी कायम आहे. गोलंदाजांमध्ये रविचंद्रन अश्विन अद्याप ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सनंतर दुसऱ्या स्थानी कायम आहे. कोहली न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत खेळला, तेव्हा तो सहाव्या स्थानी होता, पण आता तो ७५६ गुणांसह सातव्या स्थानी सरकला. लाबुशेनने ॲशेस मालिकेत आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या दोन सामन्यात चमकदार कामगिरी केली व पहिल्यांदा फलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानी पोहचला. कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट ९१२ रेटिंग गुणांनी त्याने रुट (८९७ गुण) ला पिछाडीवर टाकले. मालिकेआधी तो चौथ्या स्थानी होता, पण ब्रिस्बेनमधील पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या विजयात ७४ धावा केल्यानंतर तो दोन क्रमांकाने दुसऱ्या स्थानी पोहचला होता, पण एडिलेडमध्ये त्याने एक शतक व अर्धशतक (१०३ व ५१ धावा) ठोकले, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा २७५ धावांनी पराभव करत ॲशेस मालिकेत २-० अशी आघाडी मिळवली. त्याचा सहकारी मिशेल स्टार्क ने दुसऱ्या कसोटीत ८० धावा देत सहा विकेट मिळवल्यानंतर कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल १० मध्ये जागा मिळवण्यात यश संपादन केले. तो नवव्या स्थानी पोहचला. टी-२० आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या क्रमवारीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम फलंदाजांच्या यादीत पुन्हा एकदा अव्वल स्थानी पोहचला आहे. तो पहिले स्थान गमावण्याच्या एक आठवड्यानंतर हे स्थान प्राप्त करण्यास यशस्वी ठरला. वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात शून्य व सात धावांमुळे तो मागील आठवड्यात क्रमवारीत दोन स्थान मागे तिसऱ्या स्थानी सरकला होता. अखेरच्या टी-२० सामन्यात त्याने ७९ धावांची शानदार कामगिरी केली, ज्यामुळे पाकिस्तानने मालिकेत वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप केले. त्यामुळे तो क्रमवारीत डेव्हिड मलानसोबत संयुक्त रूपात अव्वल स्थानी आहे. त्याचा सहकारी फलंदाज मोहम्मद रिझवान ७९८ अशा कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग गुणांसह फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी पोहचला. भारताच्या मर्यादित षटकांच्या संघातील नवा उपकर्णधार के. एल. राहुल पाचव्या स्थानी काबिज सर्वोत्कृष्ट भारतीय खेळाडू आहे. टी-२० गोलंदाजांच्या यादीत अव्वल दहात कोणत्याच भारतीय गोलंदाजाची उपस्थिती नाही.