आयपीएल २०२२च्या लिलावाची तारीख ठरली

१२ आणि १३ फेब्रुवारीला बंगळुरूत पार पडणार कार्यक्रम
मुंबई – भारतीयांचा लोकप्रिय खेळ असणाऱ्या क्रिकेटची जगातील सर्वात लोकप्रिय आणि श्रीमंत लीग असणाऱ्या आयपीएल २०२२ चा थरार लवकरच प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. त्यापूर्वी या महास्पर्धेचा महालिलाव १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे पार पडणार आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने मंगळवारी या महालिलावाबद्दल चर्चा केली. बंगळुरूमध्ये १२ आणि १३ फेब्रुवारीलाच महालिलाव पार पडेल. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी ही माहिती दिली. त्याशिवाय व्हिव्होऐवजी टाटा समूह आयपीएलचा नवीन टायटल स्पॉन्सर असेल, अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे महालिलावाची तारीख आणि स्थळ बदलले जाईल, अशी चर्चा होती.
यंदाच्या मोसमात अहमदाबाद आणि लखनऊ हे दोन नवीन फ्रँचायजी आयपीएलमध्ये दाखल होत आहेत. आता आयपीएलमध्ये एकूण १० संघ असतील. आरपीएसजी समूहाने ७,०९० कोटी रुपये मोजून लखनऊ फ्रँचायजीचे हक्क विकत घेतले आहेत. सीव्हीसी कॅ पिटलने ५,६२५ कोटी रुपये मोजून अहमदाबाद संघाचे हक्क विकत घेतले आहेत. महालिलावाआधी दोन्ही संघांतील प्रत्येकी तीन खेळाडूंचे ड्राफ्टिंग करण्याची प्रोसेस सुरू झाली आहे. लीगमधील आधीचे आठ फ्रँचायजी मागच्या वर्षी खेळलेले चार खेळाडू रिटेन करू शकतात. दोन नव्या संघांना उर्वरित खेळाडूंमधून संघासाठी नवीन खेळाडू निवडता येतील.
कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) वेगवेगळ्या पर्यायांवर विचार करीत आहे. बीसीसीआयने प्लान बी बनवला आहे. या प्लाननुसार आयपीएलचा संपूर्ण सीझन महाराष्ट्रात आयोजित केला जाऊ शकतो. मुंबईतील वानखेडे स्टेडियम, त्याच्या जवळच असलेले ब्रेबॉर्न स्टेडियम, नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियम आणि पुण्यातील गहुजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनचे स्टेडियम या चार मैदानांवर संपूर्ण आयपीएलचा सीजन खेळवण्याचा बीसीसीआयचा विचार आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …