आयपीएल रिटेन वेळमर्यादेआधी काही खेळाडूंबाबत प्रश्नचिन्ह!

नवी दिल्ली – आयपीएलच्या सध्याच्या आठ फ्रँचायजीसाठी खेळाडूंना रिटेन (आपल्यासोबत कायम राखणे) करण्याची वेळमर्यादा मंगळवारी संपुष्टात येत आहे. अशात काही संघ आपल्या मुख्य खेळाडूंना कायम राखू शकतात, तर काही संघ कमी खेळाडूंना रिटेन करत लिलावात उतरणाऱ्या खेळाडूंना आपल्या संघाचे कोर बनवण्याचा प्रयत्न करतील.

पुढील वर्षी होणाऱ्या मोठ्या लिलावाआधी अखेरच्या क्षणी अनेक संघ आपल्या आवडीच्या खेळाडूंना आपल्यासोबत ठेवण्याच्या प्रयत्नात असतील. सध्याच्या आठ संघांतील रिटेन होणाऱ्या खेळाडूंना अंतिम रूप दिल्यानंतर दोन नव्या फ्रँचायजी लखनऊ व अहमदाबादला १ ते २५ डिसेंबरमध्ये तीन खेळाडूंना निवडण्याची संधी मिळेल, ज्यानंतर जानेवारीत लिलाव पार पडेल. सध्याचे आठ संघ जास्तीत जास्त चार खेळाडूंना रिटेन करू शकतात, ज्यात तीनपेक्षा जास्त भारतीय व दोनपेक्षा जास्त परदेशी खेळाडू असू शकत नाहीत. वेळमर्यादा संपण्याआधी वृत्तसंस्थेने रिटेन होणाऱ्या या संभावित खेळाडूंच्या नावाचा विचार केला आहे, तो पुढीलप्रमाणे…

  •  दिल्ली कॅपिटल्स

फ्रँचायजीला कर्णधार रिषभ पंत, पृथ्वी शॉ, अक्षर पटेल व दक्षिण आफ्रिकेचा एनरिच नॉर्कि याला अपल्यासोबत ठेवणे योग्य वाटत आहे. संघाला दरम्यान आर. अश्विन व कागिसो रबाडासारख्या चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सोडावे लागेल, ज्यांना इतर संघ लिलावादरम्यान विकत घेण्याचा प्रयत्न करतील. खांद्याच्या दुखापतीनंतर पुनरागमन करताना दिल्लीचे नेतृत्व पुन्हा न मिळाल्यामुळे स्टार खेळाडू श्रेयस अय्यर संघाला सोडत आहे.

  •  मुंबई इंडियन्स

पाच वेळचा विजेता संघ कर्णधार रोहित शर्मा व वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला संघात कायम राखू शकतो. सूर्यकुमार यादव व अनुभवी किरेन पोलार्डला देखील संघात रिटेन केले जाईल. दरम्यान, त्यांना सूर्यकुमार व ईशान किशनपैकी एकाला निवडण्याचे आव्हान असेल. गोलंदाजी न करणारा हार्दिक पंड्या पूर्वीप्रमाणे अष्टपैलू कामगिरी करत नाही, पण मुंबई त्याला पुन्हा लिलावात विकत घेण्याचा प्रयत्न करेल.

  •  चेन्नई सुपर किंग्ज

चार वेळचा विजेता चेन्नई सुपर किं ग्ज संघ आपल्या चार खेळाडूंना कायम राखेल हे निश्चित आहे. कर्णधार महेंद्रसिंह धोनी व रवींद्र जडेजा रिटेन नक्कीच संघात होतील, तर मागील सत्रात जेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावणारा ऋतुराज गायकवाड संघातील स्थान कायम राखू शकतो. परदेशी खेळाडूंत अष्टपैलू मोईन अली व अनेक वर्ष संघात कायम असलेला फाफ ड्युप्लेसिस यांच्यापैकी एक निवडावे लागू शकते.

  •  पंजाब किंग्ज

कर्णधार लोकेश राहुल लिलावात समाविष्ट होणे जवळपास निश्चित आहे. अशात फ्रँचायजी नवी सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान संघ अर्शदीप सिंग व रवी बिश्नोईसारख्या खेळाडूंना रिटेन करण्याचा प्रयत्न करेल. ते आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या खेळाडूंपैकी मयंक अग्रवाल, मोहम्मद शमी व निकोलस पूरनची निवड करू शकतात.

  •  कोलकाता नाइट रायडर्स

संघात वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, व्यकटेश अय्यर व सुनील नारायण यांना कायम राखण्याची शक्यता आहे, पण याचा अर्थ असा की, इंग्लंडला विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार इयोन मोर्गन व शुभमन गिलला लिलावात उतरावे लागेल. मॉर्गनच्या नेतृत्वात नाइट रायडर्सने आयपीएल २०२१ यूएई सत्रात शानदार पुनरागमन करताना फायनलमध्ये जागा मिळवली होती. त्याची नेतृत्वक्षमता राखताना रिलीज करण्याचा निर्णय सोप्पा नसेल.

  •  राजस्थान रॉयल्स

संजू सॅमसनला कर्णधार बनवल्यानंतर देखील संघाच नशीब बदलले नाही, पण संघ त्याला व इंग्लंडचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज जॉस बटलर यांना कायम राखण्याची शक्यता आहे. बेन स्टोक्सला कायम राखण्यासाठी संघात अडचणी असतील, जो दुखापत व मानसिक आरोग्याच्या समस्येमुळे जास्त सामने खेळू शकला नाही. फिटनेसबाबत झुंजणारा जोफ्रा आर्चरदेखील असा खेळाडू आहे, ज्याला संघात अडचण आहे. तर यशस्वी जैसवाल रिटेन होऊ शकतो.

  •  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

कर्णधारपद सोडणारा विराट कोहली व युजवेंद्र चहलला रिटेन केले जाईल, तर ग्लेन मॅक्सवेलने देखील मागील सत्रात चांगली कामगिरी केली. हर्षल पटेल व मोहम्मद सिराज यांच्यात रिटेन होण्याबाबत स्पर्धा असेल. सलामी फलंदाज देवदत्त पडिक्कलला सोडण्याचा निर्णय ही सोप्पा नसेल.

  •  सनरायजर्स हैदराबाद

मागील सत्रात माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नरसोबतच्या मतभेदामुळे चर्चेत असलेला सनरायजर्स केन विलियमसन व राशिद खानला रिटेन करणे जवळपास निश्चित आहे. अशात ते भुवनेश्वर कुमार व टी. नटराजनला आणखीन एक संधी देतात का? ते पाहावे लागेल. वॉर्नरबाबत बोलायचे झाले तर तो लिलावात आपले नाव समाविष्ट करण्याच्या प्रयत्नात असेल.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …