आयडियल जीवनगौरव क्रीडा पुरस्काराने गोविंदराव मोहिते सन्मानित

मुंबई – क्रीडा संघटक व राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांना आयडियल स्पोर्ट्स ॲकॅडमीतर्फे यंदाचा आयडियल जीवनगौरव क्रीडा पुरस्कार-२०२१ शिवाजी पार्कमधील शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. याप्रसंगी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, मुंबईचे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे, जेजे हॉस्पिटलचे अधीक्षक व क्रिकेटपटू डॉ. संजय सुरासे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांना रुपये २१०००/- सह गौरवचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ अशा स्वरूपाचा पुरस्कार देण्यात आला.

माजी क्रीडापटू व संघटक ७१ वर्षीय गोविंदराव मोहिते यांचा आयडियल जीवनगौरव क्रीडा पुरस्काराने सन्मान करण्यासाठी आयडियल स्पोर्ट्स ॲकॅडमी व शिवनेरतर्फे शिवनेरकार विश्वनाथराव वाबळे स्मृती आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन नुकतेच शिवाजी पार्क मैदानात पार पडले. मुंबईतील नामवंत रुग्णालयीन १४ संघांची टी-२० क्रिकेट स्पर्धा ग्लोबल हॉस्पिटल, हिंदुजा हॉस्पिटल, नानावटी हॉस्पिटल, कस्तुरबा हॉस्पिटल आदी संघांनी गाजविली. मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे, आयडियल स्पोर्ट्स ॲकॅडमीचे अध्यक्ष लीलाधर चव्हाण यांनी गोविंदराव मोहिते यांच्या पाच दशकांच्या क्रीडा कारकिर्दीला उजाळा देत अभिनंदनाचा वर्षाव केला. गौरवमूर्ती गोविंदराव मोहिते यांनी पुरस्काराची रक्कम क्रीडा कार्यासाठी संयोजकांकडे सुपूर्द केली. कामगार विभागामधील नावाजलेले कबड्डीपटू, व्यायामपटू व क्रीडा संघटक म्हणून गोविंदराव मोहिते यांचा लौकिक आहे. बैठका मारण्याचा त्यांचा विक्रम लालबागकरांच्या आजही स्मरणात आहे. प्रतिवर्षी विविध संस्थांमार्फत होणाऱ्या कबड्डी, बुद्धिबळ, क्रिकेट, कॅरम, कुस्ती, व्यायाम आदी स्पर्धांमध्ये त्यांचा सहभाग असतो.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …