आयकरचा सागर कातुर्डे ‘भारत श्री’

रेल्वे स्पोर्ट्सला सांघिक विजेतेपद; तामिळनाडू उपविजेता
मुंबई – कोरोनाच्या महासंकटामुळे वारंवार लांबणीवर पडणारी १३वी राष्ट्रीय अजिंक्यपद शरीरसौष्ठव अर्थातच भारत श्री स्पर्धा मोठ्या दणक्यात तेलंगणाच्या खम्मम शहरात पार पडली आणि भव्य दिव्य आयोजित झालेल्या या स्पर्धेत आयकर खात्याच्या सागर कातुर्डेने संस्मरणीय कामगिरी करीत ‘भारत श्री’चा बहुमान मिळवला. भारत श्रीच्या चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सच्या द्वंद्वात सागरसमोर अत्यंत कडवे आव्हान होते, तेव्हा सागरने आपल्या पीळदार पोझेसनी जजेसना मोहित केले आणि तामिळनाडूच्या एम. सर्वानन आणि आर. कार्तिकेश्वर या तगड्या खेळाडूंवर मात करीत पहिल्यांदा भारत श्री स्पर्धेत चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स होण्याचा भीमपराक्रम केला.
या दिमाखदार भारत श्री स्पर्धेतील सागरचे यश डोळे दिपवणारे होते. करोनामुळे नुकत्याच उझबेकिस्तान येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत सागर खेळू शकला नव्हता, मात्र भारत श्री स्पर्धेत तो आपल्या सर्वोत्तम कामगिरीसाठी उतरला. त्याने कोणतेही ध्येय डोळ्यासमोर ठेवले नव्हते, पण त्याच्या परिश्रमाने त्याला अनोखे ‘जेतेपदाचे फळ’ जिंकून दिले. किताबाच्या लढतीत दहा गटविजेते असले, तरी त्याची खरी लढत तामिळनाडूच्याच सर्वानन आणि कार्तिकेश्वरशी झाली आणि या लढतीत त्यानेच बाजी मारली.
मी जे यश मिळविले आहे त्यात सिंहाचा वाटा माझे कुटुंब, यूजेनिक्स न्यूट्रिशन आणि आयकर खात्याचा आहे. यूजेनिक्सच्या चेतन भट यांनी मला आर्थिक आणि मानसिक बळ दिल्यामुळे मी हे यश मिळवू शकलो आहे. तसेच मला आता यापेक्षा मोठी कामगिरी करायची आहे. मला माझी सर्वोत्तम कामगिरी करायची आहे. आयकर खात्यासाठी जे आजवर कुणी करू शकले नाही ते करण्यासाठी मला घाम गाळायचा आहे. मला माझ्या आयकर खात्याला आंतरराष्ट्रीय यश मिळवून द्यायचे आहे, असा विश्वासही सागर कातुर्डेने विजयानंतर व्यक्त केला. सागरच्या यशामुळे आयकरच्या स्पोर्ट्स आणि रिक्रेएशन क्लबची छाती अभिमानाने फुगली आहे. या आधी आयकर विभागासाठी इतकी जबरदस्त कामगिरी कुणीच केली नव्हती. प्रतिष्ठेच्या भारत श्री स्पर्धेत किताब विजेतेपद पटकावणारा सागर कातुर्डे हा पहिलाच शरीरसौष्ठवपटू ठरला आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि आमच्या या वीराचे जंगी स्वागत आणि कौतुक करणार असल्याची माहिती यांनी स्पोर्ट्स आणि रिक्रेएशन क्लबचे सरचिटणीस वीरेंद्र पेडणेकर आणि विजय झगडे यांनी दिली.
बेस्ट पोझर : एस. कृष्णा राव (भारतीय पोस्ट),
सर्वोत्तम प्रगतीकारक खेळाडू : नितीन चंडिला (हरियाणा)
सांघिक उपविजेतेपद : तामिळनाडू
सांघिक विजेतेपद : रेल्वे स्पोर्ट्स
भारत श्री उपविजेता : एम. सर्वानन (तामिळनाडू).
भारत श्री किताब विजेता : सागर कातुर्डे (आयकर)

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …