आधी देशाचा विचार कर; विराटला कपिल देवचा सल्ला

नवी दिल्ली – दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी बुधवारी मुंबईत झालेल्या व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत विराट कोहलीने केलेली स्फोटक विधाने भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांना पटलेली नाहीत. भारताच्या पहिल्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव कोहलीवर नाराज आहेत. टी-२० च्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा कोणी आपल्याला थांबवले नाही, असे कोहलीने काल पत्रकार परिषदेत सांगितले होते.
कोहलीचे हे विधान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या दाव्याला छेद देणारे आहे. कारण सौरव गांगुली यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना, ‘मी विराटला टी-२० चे कर्णधारपद सोडू नको, असे सांगितले होते’ अशी माहिती दिली होती.
कोहलीने हे सर्व बोलण्यासाठी जी वेळ निवडली, त्याबद्दल कपिल देव यांनी नाराजी व्यक्त केली. भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचा मोठा दौरा असताना, अशावेळी हे सर्व बोलणे योग्य नसल्याचे कपिल देव यांचे मत आहे. ‘या वेळेला दुसऱ्यांकडे बोटे दाखवणे योग्य नाही. बोर्डाचे अध्यक्ष हे बोर्डाचे अध्यक्ष असतात. पण भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवणे ही सुद्धा मोठी बाब आहे. सौरव असो किंवा विराट सार्वजनिक स्तरावर परस्परांबद्दल असे वाईट बोलणे ही चांगली गोष्ट नाही, असे कपिल देव म्हणाले. ६२ वर्षाच्या कपिल देव यांनी विराटला परिस्थितीवर नियंत्रण मिळवून सर्वप्रथम देशाचा विचार करण्याचा सल्ला दिला. जे चुकीचे आहे, ते उद्या समजेलच. पण दौऱ्याआधी असा वाद निर्माण करणे चांगले नाही, असे कपिलदेव म्हणाले. सौरव असो वा विराट खेळाडूला परिस्थिती योग्यपणे हाताळता आले पाहिजे तसेच त्यांनी आपल्या देशाचा विचार करावा, असे कपिल देव यांनी सांगितले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …