मुंबई – महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असून, प्रभाग रचनेतील बदलांमुळे येथील राजकारण तापले आहे. भाजपने सत्ताधारी शिवसेना व महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले आहेत. मतदारांची नावं गायब करण्याचा काही जण प्रयत्न करत असल्याचा नवा आरोप भाजपचे आमदार अमित साटम यांनी केला आहे, तसंच महापालिका आयुक्तांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
पालिका आयुक्तांनी चुकीच्या पद्धतीने वार्ड पुनर्रचना अहवाल निवडणूक आयोगाला सादर केला आहे. पालिका अधिकाऱ्यांनी तयार केलेला अहवाल वेगळा होता, तर चहल यांनी पाठवलेल्या अहवालात फरक आहे. महापालिका अधिकारी आणि आयुक्तांच्या लॅपटॉपचे ऑडिट करण्यात यावे म्हणजे सर्व सत्य समोर येईल, अशी मागणी साटम यांनी केली आहे. मतदारांची नावे गायब करण्याचा काही जण प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मतदारांना त्यांच्या मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे आयुक्तांवर कारवाईची मागणी आमदार साटम यांनी केली आहे. तत्पूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी राजकीय दबावाखाली, पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना डावलून संवैधानिक नियम धाब्यावर बसवले, तसंच लोकशाही मूल्य पायदळी तुडवून प्रभाग रचनेत फेरफार केला. त्याद्वारे मुंबईकरांची फसवणूक केली, असा आरोप भाजपनं केलाय. या प्रभाग रचनेचा निषेध म्हणून बुधवारी भाजप नगरसेवकांनी गटनेते प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गांधी टोपी घालून महापालिका आयुक्तांना गुलाबपुष्प देत अनोखं गांधीगिरी आंदोलन केले होते.