आता दरवर्षी २६ डिसेंबर असेल ‘वीर बाल दिवस’

  • पंतप्रधान मोदींची घोषणा

नवी दिल्ली – देशात आता प्रत्येक वर्षी २६ डिसेंबर रोजी ‘वीर बाल दिवस’ साजरा केला जाणार आहे. याबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली. पंतप्रधान म्हणाले की, आज (रविवारी), श्री गुरू गोविंद सिंगजी यांच्या जयंतीनिमित्त प्रकाश पर्वाच्या पावन प्रसंगी मला हे सांगताना अत्यंत अभिमान वाटत आहे की, यावर्षीपासून २६ डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून साजरा केला जाईल. ही साहिबजाद्यांच्या साहसाला एक आदरांजली आहे, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
साहिबजादे जोरावर सिंग आणि साहिबजादे फतेह सिंग यांना या दिवशी हौतात्म्य प्राप्त झाले होते. त्याच दिवशी ‘वीर बाल दिवस’ असेल. या दोन महात्म्यांनी धर्माच्या उदात्त तत्त्वांसाठी शत्रूंपुढे न झुकता मृत्यू स्वीकारला होता. माता गुजरी, श्री गुरू गोविंद सिंगजी आणि चार साहिबजादे यांचे शौर्य आणि आदर्श लाखो लोकांना शक्ती देतात. ते कधीही अन्यायापुढे झुकले नाहीत. त्यांनी सर्वसमावेशक आणि सामंजस्यपूर्ण जगाची कल्पना केली. त्यांच्याबद्दल अधिकाधिक लोकांना माहिती मिळणे ही काळाची गरज आहे, असे मोदींनी सांगितले. शीख धर्माचे दहावे गुरू, गुरू गोविंद सिंग यांची रविवारी जयंती होती. गुरू गोविंद सिंगजी यांनी मानवकल्याणाची, अन्यायाविरोधात लढण्याची शिकवण दिली. नैतिक मूल्यांचे पालन करण्याचा, फळाची अपेक्षा न ठेवता सत्कार्य करत राहण्याचा त्यांचा संदेश देशाचे आणि अखिल विश्वाचे कल्याण करणारे असल्याचे मोदी म्हणाले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …