आता असंघटीत क्षेत्रातील मजुरांनाही मिळणार पेन्शन

नवी दिल्ली – असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अशा सर्व मजुरांना वयाच्या साठ वर्षांनंतर दरमहा पेन्शन देण्याच्या योजनेवर केंद्र सरकारकडून काम सुरू आहे. या योजनेनुसार नोंदणी केलेल्या असंघटीत क्षेत्रातील मजुरांना वयाच्या साठ वर्षांनंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. मजुरांसाठी देण्यात येणाऱ्या पेन्शनचा खर्च हा देणगीदारांच्या पैशांतून भागवला जाणार आहे. या योजनेसाठी देणगी देण्याचे आवाहन कामगार मंत्रालयाकडून करण्यात आले आहे.
याबाबत माहिती देताना कामगार मंत्रालयाने म्हटले आहे की, ही योजना असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांसाठी आहे. वयाची साठ वर्षे पूर्ण केल्यानंतर त्यांचे वृद्धत्व सुखा समाधानाने जावे, त्यानंतर त्यांना काम करण्याची आवश्यकता भासू नये, यासाठी केंद्राने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत मजुरांना निवृत्तीनंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन देण्यात येणार आहे. या पेन्शनसाठी लागणारा पैसा हा देणग्यांमधून गोळा करण्यात येईल. ज्या देणगीदारांची या योजनेत सहभागी होण्याची इच्छा आहे, त्यांच्याकडून एकरकमी ३६ हजार रुपये घेण्यात येतील. या देणग्यांमधून आलेला सर्व पैसा हा, पंतप्रधान श्रमयोगी मानधनमध्ये (पीएमएसवायएम) जमा होणार आहे. त्यानंतर यातून असंघटीत क्षेत्रातील मजुरांना पेन्शन देण्यात येईल.
योजनेला अल्प प्रतिसाद
या योजनेबाबत अद्यापही असंघटीत क्षेत्रातील मजुरांमध्ये पुरेशी जनजागृती झाली नसल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे. या योजनेला मजुरांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यात केवळ ३५ मजुरांनी या योजनेसाठी नोंदणी केली, तर सप्टेंबर महिन्यात हीच संख्या ८५ एवढी होती. नोंदणीला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत केवळ २३६६ मजुरांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …