ठळक बातम्या

आठवणीतील शांताबाई

मराठी साहित्य सृष्टीतील एक प्रतिभा संपन्न, असं व्यक्तिमत्व म्हणजे शांता शेळके. नुकतीच त्यांची जन्मशताब्दी सुरू झालेली आहे. त्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने शांताबार्इंच्या लोभस, निरागस आणि प्रतिभा संपन्न, अशा सुसंस्कृत व्यक्तिमत्वाची आठवण होणे साहजिक आहे. शांता शेळके यांचा जन्म १२ आॅक्टोबर, १९२२ रोजी पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे जनार्दन शेळके यांच्याकडे झाला. त्यामुळे १२ आॅक्टोबरपासून त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झालेले आहे. शांता शेळके यांचे शिक्षण हुजूरपागा शाळा व स. प. महाविद्यालय, पुणे येथे झाले. त्यांनी नागपुरातील हिस्लॉप महाविद्यालय, मुंबईतील रुईया आणि महर्षी दयानंद महाविद्यालयांमध्ये मराठीच्या अध्यापिका म्हणून काम केले. आचार्य अत्र्यांचा ‘नवयुग’मध्ये उपसंपादक म्हणून ५ वर्षे कार्य केले; पण सतत काही तरी शोधण्याची आणि अभ्यास करण्याची त्यांची वृत्ती फार महत्त्वाची होती आणि कोणालाही प्रेरणा देणारी होती.
१९९६ साली आळंदीमध्ये अखिल भारतीय संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आणि तेव्हाच त्यांना समक्ष भेटायची वेळ आली. त्यावेळी शांता शेळकेंची घेतलेली मुलाखत आजही नवी आहे, असेच वाटते. त्या एक प्रतिभा संपन्न मराठी कवयित्री होत्याच; पण प्राध्यापक, गीतकार, लेखिका, अनुवादक, बाल-साहित्य लेखिका, साहित्यिक आणि पत्रकार अशा अनेक भूमिका त्यांनी सक्षमपणे सांभाळल्या आणि त्या भूमिका एका उंचीवर नेऊन ठेवल्या होत्या. अनुवादक, समीक्षा, स्तंभ लेखिका, वृत्तपत्र, सह संपादिका, म्हणूनदेखील यांचा साहित्यात मोलाचा वाटा आहे. शांताबाई या केंद्रीय फिल्म प्रमाण मंडळ, तसेच राज्य नाटक परिनिरीक्षण मंडळाच्या त्या सदस्य म्हणूनही होत्या. डॉ. वसंत अवसरे या टोपण नावाने त्यांनी गीते लिहिली आहेत.

पण हे सगळे करत असताना, त्यांनी आपला साधा स्वभाव जपला होता. आपण एवढ्या मोठ्या लेखिका आहोत, ही हवा त्यांच्या डोक्यात कधीच गेलेली नव्हती. त्यामुळे समोर आलेल्या सामान्य माणसाशीही त्या प्रेमळपणे बोलायच्या. विशेषत: समोरच्या माणसासोबत आदराने बोलणे ही त्यांची खासियत होती. मी त्यांना भेटलो, तेव्हा जेमतेम २५ वर्षांचा होतो. आळंदीतील साहित्य संमेलनापूर्वी त्यांची मुलाखत हवी होती. त्याकाळी मोबाईल वगैरे सुविधा नव्हत्या. त्यामुळे पत्र पाठवून त्यांच्याशी संवाद साधावा लागला होता; पण त्या पत्रालाही त्यांनी तातडीने उत्तर दिले होते. मुलाखत कसली, गप्पाच मारायला या. मुलाखत असं काही नसतं. आळंदीतच आपण छानपैकी बोलू. असं अगदी साध्या शब्दात त्यांनी पत्र पाठवले आणि मुलाखतीची वेळ ठरली. साहित्य संमेलन. त्यात आळंदीचे आणि त्याचे अध्यक्षपद शांताबार्इंकडे. साहजिकच गर्दी होणार हे नक्की; पण त्या काळात साहित्य संमेलनात राजकारण शिरलेले नव्हते. त्यामुळे अध्यक्षांपर्यंत सहजपणे पोहोचता आले.
शांताबार्इंनी लक्षात ठेवून दिलेल्या वेळी मला भेटण्याचा वेळ राखून ठेवला होता. चला आपण माऊलींचे दर्शन घेऊ जाता-जाता जास्त बोलू, असं इतक्या सहजपणे त्या बोलल्या की, जणू आमची वर्षानुवर्षांची ओळख आहे, असेच वाटले. वयानं खूप मोठ्या असूनही त्यांनी अहो जाहो म्हणून बोलायला सुरुवात केली. त्यांच्या डोक्यावरचा पदर आणि भरजरी नेसलेल्या साडीने खानदानी मराठी सौंदर्याचेच आणि साक्षात सरस्वतीचेच दर्शन झाल्यासारखे वाटले.

जुन्या काळापासून ते आधुनिक काळातील घडामोडींपर्यंत सगळ्यांचा त्यांचा सखोल अभ्यास असायचा. गप्पा-मुलाखतींचे सगळे विषय झाले आणि मी एक विषय काढला. त्या काळात चंद्रशेखर गोखले यांचा ‘मी माझा’ हा चारोळी संग्रह प्रचंड गाजला होता. कॉलेजच्या मुलांच्या तर त्यावर उड्या पडत होत्या. हजारोंच्या प्रतीने ते चारोळी संग्रह विकले जात होते. अगदी स्टेशनरीच्या दुकानातही ते विकालया ठेवले जात होते. तरुण-तरुणी आपल्या मैत्रिणींना आवर्जून गिफ्ट, म्हणून हा चारोळी संग्रह देत होते. साहित्य संमेलनाच्या स्टॉलवरही त्याची गर्दी होतीच. त्यामुळे एका ज्येष्ठ कवयत्रीला या चारोळी संग्रहाबाबत काय वाटते, हे विचारले. त्यावर छानसं हसून शांताबाई म्हणाल्या, छान आहेत त्यांच्या चारोळ्या. मला आवडल्या; पण हा काही नवीन आलेला साहित्य प्रकार नाही. हा खूप जुना प्रकार आहे. मी पण चारोळ्या केल्या होत्या. असे म्हणून त्यांनी भराभर दोन-तीन त्यांच्या चारोळ्या म्हणून दाखवल्या. त्यानंतर शांताबाई म्हणाल्या, ‘तुम्हाला सांगू का? हा मूळचा प्रकार म्हणजे जपानी हायकू. आज चारोळी म्हणतात आणि आम्ही हायकू म्हणून करत होतो इतकेच, म्हणजे कसं असतं, आपण छानपैकी झोपाळ्यावर बसतो. झोपाळा मागे जातो आणि पुढे येतो. तो झोका पूर्ण होईपर्यंतच पूर्ण होईल इतकी छोटी कविता असावी, म्हणून त्याला हायकू म्हणतात. छान झोका घेत म्हणायची कविता तीच आता चारोळी आहे.
मग त्यानंतर बरंच त्यांच्याकडून ऐकायला मिळालं; पण हे माझ्या आयुष्यातील दुर्मीळ असेच क्षण होते असे आज वाटते; पण शांताबाई मोठ्या होत्या याचे कारण त्यांनी आपले साधेपण जपले होते, म्हणून त्या मोठ्या होत्या. आपण दुसºयाला शिकवतो आहे, असा कधीही अहंभाव त्यांच्यात नव्हता, तर समजावून सांगण्याची एक प्रेमळ हातोटी होती. त्यामुळे त्यांची ती मुलाखत अत्यंत संस्मरणीय होती. त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने ही आठवण सांगतानाही आनंद होतो.

प्रफुल्ल फडके/मुखशुद्धी
9152448055\\

 

 

 

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …