- सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धा
नागपूर – दिमाखात बादफेरीत धडक देणाऱ्या विदर्भाची लढत आज महाराष्ट्रविरुद्ध होणार आहे. फलंदाजी व गोलंदाजीत दोन्ही संघ सक्षम असल्यामुळे सामना चुरशीचा होण्याची शक्यता असून, कोण विजय नोंदवून उपांत्यपूर्व फेरीत धडक देणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
गतवर्षी इंदूर येथे एलिट ‘ड’ गटात खेळणाऱ्या विदर्भाला विजयाचा सूरच गवसला नाही व गुणसंख्या शून्यच राहिल्यामुळे प्लेट गटात डिमोशनही झाले; परंतु विदर्भ गतवर्षीचे अपयश विसरून यावर्षी रिंगणात उतरला. अक्षय वाडकरच्या नेतृत्वात विदर्भाने प्लेट गटात अरुणाचल प्रदेश, नागालँड, मेघालय, मणिपूर आणि सिक्कीमला नमवून गुणसंख्या २० करीत दिमाखात बादफेरीत धडक दिली. साखळी सामन्यात फलंदाज जितेश शर्माने १७४, अथर्व तायडेने १४२, अपूर्व वानखेडेने १३१ आणि अक्षय वाडकरने १११ धावा करीत आपली जबाबदारी सक्षमतेने सांभाळली होती. महत्त्वाच्या उपउपांत्यपूर्व सामन्यातही धावाचा डोंगर उभारण्याची जबाबदारी यांच्याच खांद्यावर असून त्यांनीही तयारी केली आहे. गोलंदाजीमध्ये फिरकीपटू अक्षय कर्णेवारने चार षटक निर्धाव फेकून दोन गडी बाद करण्याचा विक्रम करीत १० गडी टिपले आहेत. यासह दर्शन नळकांडेने ७, अक्षय वखरेने ६ तर यश ठाकूरने ५ गडी टिपले आहेत. महाराष्ट्राला कमी धावांत रोखण्यासाठी गोलंदाजांनी कंबर कसली आहे.
एलिट ‘अ’ गटात खेळणाऱ्या महाराष्ट्राला तामिळनाडूकडून पराभवाचा सामना करावा लागला. मात्र पंजाब, ओडिशा, पुड्डूचेरी व गोवा संघाला नमवून गुणसंख्या १६ केली व बादफेरीत धडक दिली. पाच साखळी सामन्यांत महाराष्ट्राचा कर्णधार व आयपीएल स्पर्धा गाजविणाऱ्या ऋतुराज गायकवाडने २५९, यश नहारने १६४, केदार जाधवने १२० व नौशाद शेखने ११७ धावा केल्या आहेत. गोलंदाज अक्षय पालकरने ८, सत्यजित बच्छाव, दिव्यांग हिमगणेकरने प्रत्येकी ७ तर अझीम काझीने ६ गडी बाद केले आहेत. विजय नोंदवून स्पर्धेत आव्हान कायम ठेवण्यासाठी महाराष्ट्राच्या फलंदाज व गोलंदाजांनी पूर्ण तयारी केली आहे; परंतु महाराष्ट्र संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडची १७ नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. त्यामुळे तो विदर्भाविरुद्ध खेळण्याची शक्यता कमी आहे. विदर्भ आणि महाराष्ट्राचे फलंदाज व गोलंदाज फॉर्ममध्ये असून साखळी सामन्याप्रमाणेच उपउपांत्यपूर्व लढतीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. महाराष्ट्र संघातील आक्रमक फलंदाज व विदर्भासाठी धोकादायक ऋतुराज खेळण्याची शक्यता कमीच असल्यामुळे ही विदर्भासाठी जमेची बाजू आहे; परंतु उभय संघ विजयासाठी खेळणार असल्यामुळे सामना चुरशीचा होण्याची शक्यता अधिक असून कोण बाजी मारणार आणि उपांत्यपूर्व फेरीत धडक देणार, हे मंगळवारी स्पष्ट होईल.