आजपासून मुंबईतील शाळा होणार सुरू

विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याबाबत पालकांमध्ये संभ्रम

मुंबई – मुंबईत १५ डिसेंबरपासून पहिली ते सातवीच्या शाळा सुरू करा, असे निर्देश पालिकेने मुख्याध्यापकांना दिले आहेत. पालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी याबाबतच्या सूचना दिल्या आहेत, मात्र शाळा सुरू होण्यासाठी एक दिवस शिल्लक असताना काही शाळांकडून कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नसल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यात पालिकेला यश आल्यानंतर ४ ऑक्टोबरपासून मुंबईतील ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरू झाले. आता पहिली ते सातवीचे वर्ग बुधवार, १५ डिसेंबरपासून सुरू करण्यास पालिका आयुक्तांनी मंजुरी दिल्याचे पालिका शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी सांगितले. दरम्यान, पालिकेच्या ४५० इमारतींचे सॅनिटायझेशन झाले असून, खासगी शाळांचे सॅनिटायझेशन करण्याची जबाबदारी शाळा प्रशासनाची आहे, असे ही तडवी यांनी स्पष्ट केले. दरम्यान, विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणे हा पालकांचा अधिकार असून, पालकांचे संमतीपत्र बंधनकारक आहे, असेही तडवी यांनी स्पष्ट केले.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात मुंबईत कोरोनाची पहिली लाट आल्यापासून मुंबईतील शाळा बंद होत्या, तर फेब्रुवारी २०२१ च्या मध्यावर दुसरी लाट धडकली, परंतु योग्य उपचार पद्धती व मुंबईकरांची साथ यामुळे दुसरी लाट थोपवण्यात पालिकेला यश आले. तोच ओमिक्रॉन विषाणूचा शिरकाव मुंबईत झाला. ओमिक्रॉन घातक नसला, तरी झपाट्याने प्रसार होत असल्याने आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. मुंबईत ओमिक्रॉनचे ५ रुग्ण आढळले आहेत, परंतु यापैकी ३ रुग्णांनी ओमिक्रॉनवर मात केली आहे. त्यामुळे ओमिक्रॉनचा धोका तूर्तास नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शाळा सुरू करण्यास पालिका आयुक्तांनी होकार दिला आहे. जे विद्यार्थी शाळेत उपस्थित राहू शकत नाहीत, त्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण उपलब्ध होईल. त्याची व्यवस्था शाळा प्रशासनाने करावी, असे आदेश पालिका शिक्षण विभागाने दिले आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …