बुलढाणा – चिखली तालुक्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्याने बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. २४ वर्षीय मृत तरुण गेल्या काही दिवसांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता, पण त्याला परीक्षेत आणि नोकरीत अपेक्षित यश मिळत नव्हते. दुसरीकडे आई-वडिलांनी आपल्यावर आणखी किती दिवस खर्च करायचा, याची चिंता त्याला सतावत होती. यातूनच नैराश्य आलेल्या तरुणाने आपल्या शेतातील जनावरांच्या गोठ्यात गळफास घेत आयुष्याचा शेवट केला.
योगेश समाधान माळेकर, असे आत्महत्या करणाऱ्या २४ वर्षीय तरुणाचे नाव आहे. तो चिखली तालुक्यातील अंत्री खेडकर गावातील रहिवासी होता. मृत योगेश स्पर्धा परीक्षेची तयारी करत ठिकठिकाणी नोकरी शोधण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला काही नोकरी मिळत नव्हती. अशात घरी एकुलत्या एक बहिणीचे लग्न रखडले होते. त्यामुळे आई-वडील आणखी किती दिवस आपला खर्च उचलतील. याची चिंता योगेशला लागली होती. या विवंचनेतून नैराश्य आलेल्या योगेशने आपल्या शेतातील जनावरांच्या गोठ्यात नायलॉनच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. बराच वेळ योगेश घरी जेवणासाठी आला नाही, म्हणून त्याच्या कुटुंबीयांनी त्याची सर्वत्र शोधाशोध सुरू केली. आई-वडील आणि बहिणीने त्याच्या सर्व मित्रांकडे चौकशी केली, पण त्याचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. यामुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी गावाजवळ असलेल्या आपल्या शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी जनावरांच्या गोठ्यात योगेशचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. योगेशने आत्महत्या केल्याचे निदर्शनास येताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन हादरली. एकुलत्या एक हुशार मुलाने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.