- एकूण ७० विद्यार्थ्यांवर उपचार सुरू
अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील टाकळी ढोकेश्वरच्या नवोदय विद्यालयात शनिवारी १९ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर मोठी खळबळ माजली होती. रविवारी तेथील आणखीन ३१ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे पाहण्यास मिळालेले. सोमवारी देखील विद्यालयातील २० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. अशाप्रकारे या विद्यालयातील बाधितांचा आकडा आता ७० वर गेला आहे. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
नवोदय विद्यालयातील काही विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या संपर्कात आलेल्या विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आलेली. त्यातील काहींचा अहवाल रविवारी व काहींचा सोमवारी आला. रविवारी ३१ तर सोमवारी २० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. इतर विद्यार्थ्यांप्रमाणे सोमवारी आढळलेल्या २० विद्यार्थ्यांना पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या विद्यालयात चारशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. पॉझिटिव्ह आलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वॉबचे नमुने ओमिक्रॉनच्या चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या विद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या तब्बल ७० वर पोहचल्यामुळे येथील यंत्रणा सतर्क झाली आहे. बाधित रुग्णांच्या संपर्कातील इतर विद्यार्थ्यांची देखील कोरोना चाचणी करण्यात येणार आहे, तसेच इतर विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्याचे आवाहन नवोदय विद्यालय प्रशासन, तसेच स्थानिक आरोग्य विभागाने केले आहे.