- – आता नांदेड, धर्माबादला जाणार,
- – किरीट सोमय्यांचा इशारा
मुंबई – राज्यातील सत्ताधाऱ्यांवर आरोपांच्या फैरी झाडणारे भाजप नेते किरीट सोमय्या पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कुटुंबाला तब्बल ३०० कोटी रुपयांचे कर्ज दिल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे राज्यातील कथित घोटाळ्यांच्या आरोप-प्रत्यारोपाला पुन्हा एकदा ऊत येणार असून, सोमय्यांनी आता नांदेड व धर्माबादला जाण्याचा इशारा दिला आहे.
बुधवारी केलेल्या आपल्या नव्या आरोपात किरीट सोमय्यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाणांवर निशाणा साधला. यावेळी सोमय्या म्हणाले की, आयकर खात्याने आज (बुधवारी) पुन्हा नांदेड, धर्माबाद शाखेत छापा मारला आहे. अशोक चव्हाण कुटुंबाला ३०० कोटींचे कर्ज देण्यात आले आहे, असा खळबळजनक दावाही सोमय्यांनी केला. याचा पाठपुरावा करण्यासाठी आपण नांदेड, धर्माबादला जाणार आहोत. बुलढाणा अर्बन नागरी पतपेढीचा दुरुपयोग झाला आहे, असा आरोपही सोमय्यांनी केला. दरम्यान, सोमय्यांनी शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांच्यावरही यावेळी जोरदार टीका केली. ते म्हणाले, आज बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी आहे आणि तिकडे अर्जुन खोतकर हिरवे झाले आहेत. याचाही पाठपुरावा मी करणार आहे. जनतेला या घोटाळेबाजांचा हिशोब पाहिजे. उद्धव ठाकारेंकडे अर्जुन आहेत, त्यांना पैसे हवे आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
सोमय्या पुढे म्हणाले की, आजपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हिंदूंची अवहेलना करायचे. आता संजय राऊतांची भाषा ऐका. काय म्हणे तर आम्ही सगळ्या हिंदूंच्या मागे. हिंदूंना सेकंड सिटीझन बनवण्याचा कट सुरू आहे. हिंदूंना द्वितीय नागरिक बनवणे मान्य नाही, असा आरोप त्यांनी केला.