अवकाळी पावसाचा फटका – नुकसानीमुळे द्राक्ष बागायत शेतकऱ्याची आत्महत्या

सांगली – अवकाळीने झालेले नुकसान आता खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या जीवावर उठू लागले आहे. पीक पद्धतीमध्ये बदल करून उत्पन्न वाढवण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न देखील अयशस्वी ठरत आहे. दरवर्षी द्राक्ष बागेचे होत असलेले नुकसान अन् वाढते कर्ज यामुळे मिरज तालुक्यातील द्राक्ष बागायत शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागेचे न भरून निघणारे नुकसान झाले. ऐन काढणीच्या प्रसंगीच दरवर्षी बागांचे नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झालेत.

मिरज तालुक्यातील मालगाव येथील चिदानंद घुळी हे दरवर्षी द्राक्षाचे उत्पादन घेत होते. मात्र, गेल्या ३ वर्षांपासून अवकाळी पावसामुळे उत्पादन कमी अन् खर्च अधिक अशीच स्थिती होती. यामुळे त्यांच्यावर बँकेचे आणि खासगी सावकाराचेही कर्ज झाले होते. यंदाही द्राक्षांची तोडणी १५ दिवसांवर आली असतानाच अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. यामध्ये ३ एकरातील द्राक्षांची मणगळ झाली. आता कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून चिदानंद यांनी शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले आहे. चिदानंद घुळी यांनी उत्पादन वाढीच्या अनुषंगाने द्राक्ष बागेची लागवड केली होती. सुरुवातीचे काही वर्ष यामधून उत्पादनही मिळाले मात्र, गेल्या ३ वर्षांपासून अवकाळी पावसाने फळबागायत शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. ऐन तोडणीच्या प्रसंगीच अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने मणगळ होत आहे. त्यामुळे वर्षभर केलेला खर्च आणि मेहनत दोन्हीही निष्फळ ठरत आहे. घुळी यांच्याकडे बँकेचे तसेच खासगी सावकारांचेही कर्ज होते. यंदाही नुकसान झाल्याने कर्ज कसे फेडावे या काळजीनेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जाते.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …