- हंगाम लांबणीवर व उत्पादनातही घट?
रत्नागिरी – फळांचा राजा आंब्यासाठी हिवाळ्यातील वातावरण चांगले असते, पण यंदा झालेल्या अवकाळी पावसामुळे आंब्याच्या मुळापासून ते मोहरपर्यंतच सर्वच गणित बिघडलेले आहे. या सर्व घडामोडीमुळे आंबा उत्पादनात ६० टक्के घट होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच यंदाचा हंगाम महिन्याभराने लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे फळबागायत शेतकऱ्यांचे नुकसान तर होणारच आहे, पण खवय्यांना आंब्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे. अवकाळी पावसामुळे फळबागायत शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे खऱ्या अर्थाने गणितच बिघडलेले आहे. एकतर बागा जोपासण्यासाठी लाखोंचा खर्च करावा लागला असून, आता मोहर लागला असतानाच पाऊस आणि वातावरणामुळे सर्व मेहनत आणि झालेला खर्च वाया जाणार असे चित्र सध्या तरी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पाहण्यास मिळत आहे.
सध्या आंब्याला मोहोर लगडलेला आहे. असे असताना पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे हा मोहोर गळून पडत आहे. म्हणजेच पावसाच्या माऱ्यामुळे आंब्याच्या लहान कैऱ्याच गळत आहेत तर दुसरीकडे पावसामुळे हवामानात आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. यामुळे झाडांची मुळे पक्की होणार नाहीत परिणामी फळांची वाढही मोठ्या प्रमाणात होणार नाही. त्यामुळे पालवी फुटणार पण त्याचे फळामध्ये रूपांतरच होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना देखील आता उत्पादनाची शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. आतापर्यंत आंब्याचा हंगाम लांबणीवर पडणार असल्याचे सांगितले जात होते, पण गेल्या दोन दिवसांपासून अवकाळीमध्ये सातत्य राहिल्याने हंगाम लांबणीवरच नाही तर हंगामच यशस्वी होणार की नाही हा प्रश्न फळबागायत शेतकऱ्यांमध्ये आहे. कारण थेट कैऱ्यावरच परिणाम होऊ लागला आहे. शिवाय आता फवारणी करायची म्हणंल तर शेतकऱ्यांचा खर्च वाढणार आहे. त्यामुळे यंदाचा आंब्याचा हंगाम रामभरोसेच आहे. कैऱ्यावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे.