ठळक बातम्या

अलविदा! सीडीएस जनरल बिपीन रावत पंचतत्वात विलीन

* लष्करी इतमामात अंत्यसंस्कार * दोन्ही कन्यांनी दिला मुखाग्नी * चार देशांच्या प्रतिनिधींची मानवंदना * १७ तोफांची सलामी * ‘अमर रहे’च्या नाऱ्याने देश दुमदुमला

नवी दिल्ली – तामिळनाडूतील कुन्नूरच्या जंगलात घडलेल्या भीषण हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले देशाचे माजी लष्करप्रमुख आणि पहिले संरक्षण दलप्रमुख (सीडीएस) जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्या पार्थिवांवर शुक्रवारी येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सीडीएस जनरल बिपीन रावत हे पत्नीसह वेलिंग्टन येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात असताना घडलेल्या या  हेलिकॉप्टर दुर्घटनेत बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्यासह अन्य ११ अधिकारी-जवानांचाही मृत्यू झाला होता. बिपीन रावत, मधुलिका रावत आणि इतर अधिकारी-जवानांचे पार्थिव गुरुवारी सांयकाळी दिल्लीला आणण्यात आले होते. तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह बड्या नेत्यांनी सर्व शहिदांना आदरांजली वाहिली होती. शहीद सीडीएस बिपीन रावत यांच्यासह मधुलिका रावत यांच्या पार्थिवाला त्यांच्या दोन्ही मुलींनी मुखाग्नी दिला.

‘अमर रहे अमर रहे जनरल रावत अमर रहे’, ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’, ‘जब तक सूरज चांद रहेगा, बिपीनजी का नाम रहेगा’, ‘बिपीनजी अमर रहे अमर रहे, अमर रहे’च्या घोषणा देत देशाच्या या अस्सल हिरोला दिल्लीच्या ब्रार चौक स्मशानभूमीत अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्या पार्थिवावरही याच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. जनरल बिपीन रावत यांच्या पार्थिवाला त्यांच्या कन्येने मुखाग्नी दिला अन् देशाचा श्वास थांबला. हजारो डोळ्यांतून अश्रू ओघळले. एका पर्वाचा अस्त झाला.

शुक्रवारी सायंकाळी ५ च्या सुमारास बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्या पार्थिवावर दिल्लीच्या ब्रार चौक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. रावत यांची अंत्ययात्रा स्मशानभूमीत आल्यावर त्यांना १७ तोफांची सलामी देण्यात आली. त्यानंतर मंत्रोच्चारात लष्करी इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या कन्या कृ तिका आणि तारिणी यांनी आपल्या मात्या-पित्यांना मुखाग्नी दिला. कृ तिका आणि तारिणी यांनी बिपीन रावत आणि मधुलिका रावत यांच्या पार्थिवाला मुखाग्नी देताच अनेकांना अश्रू अनावर झाले होते.
सीडीएस बिपीन रावत यांच्या अंत्यसंस्कारासाठी हजारो लोक जमले होते. दिल्ली आणि आसपासच्या राज्यांतूनही लोक आले होते, तसेच श्रीलंका, भूतान, नेपाळ आणि बांगलादेश या देशांचे सैन्यदलप्रमुखही या वीर योद्ध्याला अखेरची सलामी (मानवंदना) देण्यासाठी आले होते. स्वत: देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे रावत यांच्या अंत्ययात्रेत सामिल झाले होते.
जनसागर उसळला
रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचे पार्थिव एका फुलांनी सजवलेल्या ट्रकमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा निघाली. यावेळी दिल्लीकर मोठ्या संख्येने या अंत्ययात्रेत सामिल झाले होते. तिन्ही संरक्षण दलांचे अधिकारी या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. लोक हातात तिरंगा घेऊन ट्रकच्या मागे पळताना दिसत होते. अबालवृद्ध आणि तरुणही या अंत्ययात्रेत सामिल झाले होते. ब्रार चौक येथे ८०० सैनिक तैनात होते. या सैनिकांमध्ये वायूसेना, नौदल आणि लष्कराच्या सैनिकांचा समावेश आहे. तीनही सेना दलांच्या प्रमुखांनी सीडीएस जनरल बिपीन रावत यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर ८०० सैनिकांनीही त्यांना मानवंदना दिली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …