अलका मित्तल ठरल्या ‘ओएनजीसी’च्या पहिल्या महिला अध्यक्ष

मुंबई – सुभाष कुमार यांच्या जागी अलका मित्तल यांची ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी)च्या अंतरिम अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत ३ जानेवारीला कंपनीने अधिकृत घोषणा केली. या नियुक्तीमुळे, मित्तल या ओएनजीसीच्या इतिहासात पूर्णवेळ संचालकपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. दरम्यान, ही नियुक्ती सहा महिने किंवा या पदासाठी नियमित नियुक्ती जाहीर होईपर्यंत असेल, असे कंपनीने म्हटले आहे.

३१ मार्च २०२१ रोजी शशी शंकर हे प्रमुख या पदावरून निवृत्त झाल्यापासून ओएनजीसीकडे पूर्णवेळ अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नव्हते. सामान्यत: या पदावर असलेल्या व्यक्तीच्या निवृत्तीच्या किमान काही महिने आधी भावी प्रमुखाची निवड होते. परंतु, यावेळी शंकर यांच्या निवृत्तीनंतर, तत्कालीन ज्येष्ठ संचालकांकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. माजी संचालक सुभाष कुमार (वित्त विभाग) यांच्याकडे (१ एप्रिल २०२१)ला या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. परंतु, कुमारदेखील डिसेंबरच्या अखेरीस निवृत्त झाले, त्यामुळे हे पद काही दिवस रिक्त होते. त्यावर आता मित्तल यांची निवड झाली आहे. मित्तल या सध्या संचालक मंडळातील सर्वात वरिष्ठ आहेत. हीच बाब लक्षात घेऊन त्यांना सीएमडीचे पद दिले जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, वेगळा काही निर्णय होतो का?, अशीही शंका व्यक्त केली जात होती. परंतु, मित्तल यांच्याकडेच हा पदभार देण्यात आला. अलका मित्तल या अर्थशास्त्रात पदव्युत्तर झालेल्या आहेत. तसेच, त्यांनी वाणिज्य आणि व्यवसाय अभ्यासात डॉक्टरेट पदवी मिळवलेली आहे.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …