मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ७ नोव्हेंबर रोजी एकांतवासात जाण्याबाबत पोस्ट केली होती. यानंतर अनेक तर्कवितर्क आणि चर्चा रंगू लागल्या होत्या. आता डॉ. अमोल कोल्हे यांनी समोर येऊन यामागचे कारण सांगत सर्व उलट सुलट चर्चांना पूर्णविराम दिला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी यामागचे खरे कारण सांगितले. ते म्हणाले की, मी एकांतवासात ७ नोव्हेंबर रोजी जाण्याबाबत पोस्ट केली. त्यानंतर तर्कवितर्क आणि चर्चा रंगू लागल्या. माझ्या एकांतवासाविषयी अनेक चर्चा रंगल्यानंतर मला असे वाटले की, आपण स्वत:च याचा उलगडा करावा.
अमोल कोल्हे म्हणाले की, माझ्या एकांतवासाबाबत अनेकांनी वेगवेगळे अर्थ काढले. काहींनी तर राजकीय संन्यासाविषयी तर काहींनी डायरेक्ट पक्षांतरबाबत देखील भाष्य केले. मात्र माझ्या एकांतवासात जाण्याचे कारण होते, मानसिक विश्रांतीचे. आपण व्यक्त कुठे व्हायचे हा प्रश्न उभा राहतो आणि मग साचलेपण येत. त्यातून मधुमेह, हृदयविकार असे अनेक विकार समोर येतात. त्यामुळे व्यक्त होणे, मोकळे होणे महत्त्वाचे आहे. व्यक्त होणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे, असे ते म्हणाले. कोल्हे पुढे म्हणाले की, आपण माझी काळजी केली. अनेक जण माझ्या एकांतवासाच्या पोस्टवर व्यक्त झाले. मला मात्र यातून एक जाणीव झाली. ती म्हणजे आपल्या मानसिक आरोग्याच्या जाणिवेची गरज. तुमच्या-माझ्यासारख्या माणसाला येणारा आणि दुर्लक्षिला जाणारा मानसिक थकवा. ही मला सर्वात महत्त्वाची गोष्ट वाटली. आपण अनेक दुर्दैवी बातम्या ऐकतो. वयाच्या तिशीत हृदयविकाराने मृत्यू, पस्तीशित मधुमेह, अस्थमा, वगैरे. या साऱ्या आजाराचे मूळ आपल्या मानसिकतेत आहे, असे एक डॉक्टर म्हणून कोल्हे यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले.