अमृता फडणवीसांची राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांना अब्रुनुकसानाची नोटीस

मुंबई – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि राष्ट्रवादी नेत्या विद्या चव्हाण यांच्यात वाद पेटला आहे. अमृता फडणवीस यांनी राष्ट्रवादी नेत्या विद्या चव्हाण यांना अब्रुनुकसानाची नोटीस पाठवली आहे. विद्या चव्हाणांनी अमृता फडणवीसांचा उल्लेख ‘डान्सिंग डॉल’ असा उल्लेख केला होता. यावर आक्षेप घेत अमृता फडणवीसांनी विद्या चव्हाण यांना अब्रुनुकसानाची नोटीस धाडली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या जितेन गजारिया यांचा विद्या चव्हाण यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला, मात्र हा निषेध नोंदवताना त्यांनी त्यात अमृता फडणवीस यांनाही ओढले होते. दरम्यान, अमृता फडणवीस यांनी ट्विट केले आहे. अमृता फडणवीस आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या, आपल्याच सुनेच्या आणि पुरोगामी स्त्रियांच्या चारित्र्याचा जी करते अपमान, ती आहे नेता विद्याहीन चव्हाण, आता कोर्टातच जाऊन साफ करावी लागेल, तिने पसरविलेली सगळी विषारी घाण! विद्या चव्हाण मानहानी नोटीस वाच आणि सुधार स्वत:ला, मगच मिळेल तुला निर्वाण! दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण याबाबत म्हणाल्या की, अमृता फडणवीस यांनी पाठवलेली कोणतीही नोटीस मला मिळाली नाही. दुसरीकडे, विद्या चव्हाण यांनी माफी मागितली तर ठीक आहे, अन्यथा मला त्यांच्या घरी सिद्धिविनायकाचा प्रसाद घेऊन जावा लागेल असे अमृता फडणवीस एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाल्या, तर तसदी घेऊ नका मी दर मंगळवारी सिद्धिविनायक मंदिरात जाते असे उत्तर विद्या चव्हाण यांनी दिले आहे. त्यामुळे आता अमृता फडणवीसांच्या कायदेशीर नोटिशीला विद्या चव्हाण काय उत्तर देतात. त्या माफी मागतात की, कोर्टाची लढाई लढतात हे बघावे लागणार आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …