अमरावती हिंसाचार; दोषींवर कारवाईचे गृहमंत्र्यांचे आश्वासन

मुंबई – त्रिपुरामध्ये मशिदीवर हल्ला झाल्याचे कथित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्रिपुरासह महाराष्ट्रात देखील याचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. यावरून अमरावतीमध्ये दंगल उसळली होती. जमावाकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेत काही पोलीस देखील जखमी झाले. दोन दिवस शहरात तणावपूर्ण वातावरण होते; मात्र आता तेथील परिस्थिती नियंत्रणात आली असून, शहरात शांतता असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे. या प्रकरणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाईची दिशा ठरवू, जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे देखील त्यांनी म्हटले आहे. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, सध्या शहरातील परिस्थिती नियंत्रणात आहे. गेले दोन दिवस त्रिपुरा घटनेच्या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये तणावपूर्ण वातावरण होते. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने जिल्हा प्रशासनाकडून पुढील तीन दिवस संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरवू, या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही गृहमंत्र्यांनी म्हटले आहे, तसेच या दंगलीमध्ये ज्या व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांच्या नुकसानाचाही आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
अमरावतीमध्ये गेले दोन दिवस तणावपूर्ण वातावरण होते. आता परिस्थिती निवळली आहे; मात्र तरी देखील पुढील तीन दिवस तेथे संचारबंदी कायम ठेवण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. संचारबंदीमध्ये पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे, तसेच काही अत्यावश्यक काम असेल, तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …