अमरावतीत कलम १४४ लागू; इंटरनेट सेवाही बंद

अमरावती – अमरावतीत बंद दरम्यान शनिवारी झालेल्या हिंसाचारानंतर शहरात पुढील ४ दिवस कलम १४४ लागू करण्यात आले आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी याची माहिती दिली. तसेच इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरण्याची भीती असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ अमरावतीत शुक्रवारी काढलेल्या मोर्चादरम्यान काही दुकानांची तोडफोड झाली. याच्या निषेधार्थ शनिवारी अमरावतीत बंद पुकारण्यात आलेला; पण त्यालाही गालबोट लागले. दरम्यान, पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

बंददरम्यान शहरातील रस्त्यांवर उतरलेल्या जमावाकडून काही ठिकाणी तोडफोड करण्यात आली. यावेळी जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी काही ठिकाणी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. शनिवारी अमरावतीतील राजकमल चौकात मोठ्या संख्येनं जमाव एकवटला व त्यांनी दुकानांची तोडफोड सुरू केली. अशात पालकमंत्री व पोलीस प्रशासनाने परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, म्हणून अमरावतीत कलम १४४ लागू केले.

  • जमावाने टपरी जाळली

शनिवारी राजकमल चौक परिसरातील एका टपरीलाही एका जमावाने आग लावली. या टपरीतील सामान आधी काढून घेण्यात आले होते; मात्र भर बाजारातील या टपरीला आग लावल्याने परिसरात धूर आणि आगीचे मोठे लोट उठताना दिसले. दरम्यान हा प्रकार थांबवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला. त्यानंतर जमाव पांगला गेला.

  •  दंगलनियंत्रक पथके तैनात

अमरावतीत दोन गटांतील वादाला हिंसक वळण मिळाल्यामुळे शहरात दंगलनियंत्रक पथके तैनात करण्यात आली आहेत. शहरातील काही ठिकाणी जमाव हिंसक झाला असला, तरीही उर्वरित शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …