ठळक बातम्या

अभ्यास आणि विद्वतेचे अजीर्ण होऊ नये – राऊतांचे शरसंधान

मुंबई – विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रियेला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आक्षेप घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना पत्र लिहून जोरदार हल्ला केला. त्यानंतर मंगळवारी शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपालांवर शरसंधान केले. राज्यपाल हुशार आहेत. विद्वान आहेत. अभ्यासू आहेत, पण अभ्यास आणि विद्वतेचे अजीर्ण होऊ नये. नाही तर पोटाचा त्रास होतो, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जे उत्तर पाठवले ते तुमच्या समोर आहे. राज्यपालांनी इतका अभ्यास करू नये. घटनेतील तरतुदीनुसार काम करण्यासाठी राज्यपालांची नियुक्ती असते. विधानसभेचे हक्क, सरकारच्या शिफारशी आणि लोकभावना या डावलून काम करण्यासाठी राज्यपालांची नियुक्ती होत नाही. राज्यपाल अभ्यासू आहेत. विद्वान आहेत. पण त्या अभ्यासाचे आणि विद्वतेचे अजीर्ण होऊ नये. सध्या राज्याच्या राजभवनात अभ्यासाचे अजीर्ण झालेले आहे. अजीर्ण झाले की, पोटाचा त्रास होतो. असा त्रास काही लोकांना होत असेल, तर राज्याचे आरोग्य खाते उपचार करायला सक्षम आहे, असा हल्ला राऊत यांनी चढवला. विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरून आघाडीत मतभेद आहेत का?, असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर आघाडीत बिघाडीचा प्रश्नच येत नाही. राज्यपाल जर घटनेच्या विरुद्ध वागत असतील, राज्यपालांनी राजकीय वर्तन करावे, असा त्यांच्यावर दबाव असेल, तर सरकारलाही राजकीय पावले टाकावी लागतील, असा इशारा त्यांनी दिला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …