पुणे – मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्यावर अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीला मारहाण, मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे कळते. याप्रकरणी स्नेहा अनिकेत विश्वासराव (२९, रा. करिष्मा सोसायटी, कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेमुळे मराठी चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे.
स्नेहा विश्वासरावने दिलेल्या फिर्यादीत, करिअरमध्ये आपल्यापेक्षा पत्नीचे नाव मोठे होईल या भीतीने त्याने गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला, तसेच लोकांसमोर मारहाण करून अपमानास्पद वागणूक देत अतोनात छळ केल्याचेही म्हटले आहे. याप्रकरणी अनिकेत विश्वासरावसह त्याच्या आई-वडिलांवर ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अनिकेत मूळचा मुंबईचा आहे. २०१८ मध्ये त्याचे आणि स्नेहा चव्हाणचे लग्न झाले. स्नेहा देखील अभिनेत्री असून, तिने काही मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून त्या दोघांमध्ये सतत वाद होत होते. यातूनच स्नेहाने अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दिली, त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अलंकार पोलीस अधिक तपास करीत आहेत. अनिकेतने ‘पोस्टर बॉइज’,’मस्का’, ‘बस स्टॉप’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनिकेतने अभिनयक्षेत्रातील पदार्पण ‘नकळत सारे घडले’ या नाटकाद्वारे केले, तसेच त्याने ‘ऊन-पाऊस’ आणि ‘कळत नकळत’ या मालिकांमध्ये काम केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्नेहाला पती अनिकेतने १० डिसेंबर २०१८ ते २ फेब्रुवारी २०२१ या तीन वर्षांच्या काळात सिनेसृष्टीत आपल्यापेक्षा पत्नीचे नाव मोठे होईल, या भीतीपोटी वेळोवेळी नातेवाईकांसमोर अपमानास्पद वागणूक दिली, तसेच गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्नदेखील करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणात पती अनिकेत विश्वासराव याला सासरे चंद्रकांत आणि सासू अदिती यांनी साथ देण्याचे काम केले आहे. त्या पार्श्वभूमीवर पत्नी स्नेहाने दिलेल्या तक्रारीवरून पती अनिकेतसह सासरे चंद्रकांत विश्वासराव आणि सासू अदिती विश्वासराव यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.