दोन दिवसांपूर्वी झालेल्या १४ पोटनिवडणुकांची मतमोजणी मंगळवारी झाली. यात सर्वाधिक लक्ष लागलेले होते ते नांदेड जिल्ह्यातील देगलूरची पोटनिवडणूक आणि दादरा-नगर-हवेलीची लोकसभा पोटनिवडणूक. या दोन्ही निवडणुकींमध्ये भारतीय जनता पक्ष विरोधात सगळे विरोधी पक्ष असे चित्र होते; पण इथे भाजपला यश मिळालेले नसले, तरी त्यांचे काहीही नुकसान झालेले नाही, कारण या निवडणुका ज्या कारणांमुळे होत आहेत, त्या मतदारसंघात भाजपचे आमदार किंवा खासदार नव्हते. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांतील जागा जैसे थे राहिल्या असतील, तर हा महाविकास आघाडीचा खूप मोठा विजय आहे, असे समजायचे कारण नाही.
देगलूर पोटनिवडणुकीत काँग्रेसचे जितेश अंतापूरकर विजयी झाले आहेत. या मतदारसंघातून २०१९च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे रावसाहेब अंतापूरकर यांनी शिवसेनेचे उमेदवार सुभाष साबणे यांचा २२ हजार मतांनी पराभव केला होता. आमदार अंतापूरकर यांचं निधन झालं. त्यामुळे आता या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे नेते सुभाष साबणे यांनी भाजपात प्रवेश केला आणि त्यांना भाजपने उमेदवारी दिली. यामागचे कारण होते की, या मतदारसंघातून आमदार होणे ही साबणेंची महत्त्वाकांक्षा होती. पोटनिवडणुकीत आपल्याला संधी मिळणार नाही, याची जाणीव साबणेंना झाली. २०१९च्या विधानसभा निवडणुका भाजप आणि शिवसेना यांनी युती करून लढवल्या होत्या. युतीचे उमेदवार म्हणून ते काँग्रेसच्या अंतापूरकर यांच्या विरोधात ते लढले; पण आता शिवसेना आणि काँग्रेस सरकारमध्ये एकत्र असल्यामुळे शिवसेना उमेदवार उभा करण्याचा प्रश्न नाही. साहजिकच साबणे यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपच्या दृष्टीने ताकद पणाला लावली, तरी इथे विजय मिळणे शक्य नव्हते. कारण एकतर पोटनिवडणुकीत एखाद्या नेत्याच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबीयांना जेव्हा तिकीट मिळते, तेव्हा सहसा निकाल बदलत नाही. त्यात शिवसेनेची मते काँग्रेसच्या बाजूला झुकल्याने हा विजय सहज मिळणार याची काँग्रेसला खात्री होतीच; पण तरीही रावसाहेब अंतापूरकर यांनी जेवढे मताधिक्य घेतले होते, त्यापेक्षा जास्त मताधिक्य मिळणे अपेक्षित होते. कारण शिवसेनेची मते काँग्रेसमध्ये होती; पण ते शक्य झालेले नाही, याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे भाजपचे काहीच नुकसान झालेले नाही. महाविकास आघाडीचा हा दणदणीत विजय आहे, असेही म्हणता येणार नाही.
विशेष म्हणजे या निवडणुकीत दोन तुल्यबळ प्रतिस्पर्धी असतानाच वंचित बहुजन आघाडीने उच्च शिक्षित उमेदवार देऊन तगडे आव्हान उभे केले होते. खरं तर देगलूर-बिलोली हा मतदारसंघ सीमावर्ती विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. या संपूर्ण मतदारसंघात एकही मोठा उद्योग नाही, त्यामुळे इथे बेरोजगारी ही प्रमुख समस्या असल्याची सातत्याने ओरड होते. दोन्ही तालुक्यांत अंतर्गत रस्त्यांची समस्या असल्याची तक्रार मतदार सातत्याने करतात. मतदारसंघात प्रवाही नद्या आहेत; पण म्हणावे तसे सिंचन प्रकल्प कोणत्याही राजकीय पक्षाने मार्गी लावले नाहीत. राज्याच्या विधानसभेत देगलूर विधानसभेचा क्रमांक हा ९० आहे. देगलूर विधानसभा क्षेत्रात देगलूर आणि बिलोली या दोन तालुक्यांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्याने काँग्रेसचे दोन मुख्यमंत्री दिले; पण या भागाकडे काँग्रेसचे दुर्लक्षच राहिलेले आहे. शंकरराव चव्हाण आणि त्यांचे पुत्र अशोक चव्हाण दोघेही या जिल्ह्यातून येतात; पण त्यांनी या भागाकडे विकासाच्या दृष्टीने दुर्लक्ष केले, तरीही काँग्रेसचा मतदार इथे प्रामाणिकपणे मतदान करत आला आणि काँग्रेसला निवडून देत राहिला आहे. ही बाब मांडण्यात विरोधकांना आजपर्यंत यश आलेले नाही. हे दोन्ही तालुके तेलंगणा आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवर नांदेड जिल्ह्यातील शेवटचे तालुके आहेत. सध्याची मतदार संख्या सुमारे २ लाख ९८ हजार एवढी आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकांत हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला, तेव्हापासून या मतदारसंघाकडे प्रमुख नेत्यांचं दुर्लक्ष झाल्याचं म्हटलं जातं.
या मतदारसंघातून अंतापूरकर आणि साबणे हे परंपरागत प्रतिस्पर्धी राहिले आहेत. २००९ला हा मतदारसंघ आरक्षित झाल्यानंतर काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर यांनी शिवसेनेच्या सुभाष साबणे यांचा ६ हजार मतांच्या फरकाने पराभव केला होता. विशेष म्हणजे तेव्हा अंतापूरकर यांनी शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन प्रथमच निवडणूक लढवली आणि विजयी झाले होते. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत सेनेच्या सुभाष साबणे यांनी काँग्रेसच्या रावसाहेब अंतापूरकर यांचा ८ हजार मतांनी पराभव केला होता. २०१९ साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या रावसाहेब अंतापूरकर यांनी सेनेच्या सुभाष साबणे यांचा २२ हजार मतांनी पराभव केला. या सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे या मतदारसंघात अंतापूरकर आणि साबणे हे दोघेच एकमेकांवर मात करत राहिले; पण आता चित्र बदललं आहे. काही महिन्यांपूर्वी रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन झाले, त्यामुळे पोटनिवडणुकीत काँग्रेसने रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी दिली आहे. ही पोटनिवडणूक नांदेड जिल्ह्यात राजकीय पक्ष बदलासाठी चर्चेत राहिली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर हे काही वर्षांपूर्वी नाराज होऊन काँग्रेस सोडून भाजपात गेले होते. त्यावेळी काँग्रेसचे माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा हे देखील भाजपमध्ये गेले होते; पण या पोटनिवडणुकीत त्यांचे मनपरिवर्तन झाले अन् हे दोघेही भाजप सोडून पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. खतगावकर यांचे देगलूर विधानसभा क्षेत्रात वर्चस्व आहे. माजी आमदार सुभाष साबणे यांना मात्र काहीही करून पोटनिवडणूक लढवायचीच होती. त्यामुळे अखेर त्यांनी शिवसेनेचा त्याग करून भाजपशी घरोबा केला; पण त्यांना यश मिळाले नाही. यात भाजपचे नुकसानही झालेले नाही.
खरंतर ही निवडणूक केवळ देगलूर विधानसभेची पोटनिवडणूक आहे; पण या निवडणुकीसाठी राज्याच्या आणि केंद्राच्या पातळीवरचे अनेक नेते व मंत्री प्रचाराला आले होते. दादरा-नगर-हवेलीतही डेलकर कुटुंबाकडे सहानुभूतीची लाट आहे. त्यात शिवसेनेची साथ आहे. त्यामुळे त्यांचा विजय होणे स्वाभाविक आहे. ही जागाही काही भाजपकडे नव्हतीच. त्यामुळे शिवसेनेचे संसदेतील संख्याबळ वाढणार आहे आणि त्याचा फायदा होत आहे; पण या दोन्ही निवडणुकींमध्ये भाजपने प्रतिष्ठा पणाला लावली असली, तरीही त्यांना यश मिळाले नसले तरी नुकसान झालेले नाही. शिवसेनेचा मात्र या निवडणुकीमुळे फायदा झालेला आहे. त्याचा फायदा भविष्यात सेनेला होईल यात शंका नाही, तसेच दोन्हीकडे भाजपचे उमेदवार पडले असले, तरी त्यांचे नाक वरच आहे.
प्रफुल्ल फडके/बिटवीन द लाईन्स
9152448055\\