अन्न हे पूर्णब्रह्म

ह्यअन्न हे पूर्णब्रह्मह्ण या अर्थाचा श्लोक म्हणून आपण जेवण्याची सुरुवात करतो आणि जेवणाच्या ताटात वाढलेले अन्न टाकून देतो. किती हा विरोधाभास?
काही पदार्थ मुळातच आवडत नाहीत, तर काही चव घेतल्यावर आवडत नाहीत?, आवड ही व्यक्ती सापेक्ष असते, म्हणजे काहींना गोड पदार्थ आवडतात, काहींना तिखट, बरेच जण तेलकट व चमचमीत पदार्थांचे भोक्ते असतात.

पूर्वीच्या काळी पंगत प्रथा होती, जिथे सर्वांना सरसकट सर्व पदार्थ समसमान वाढले जात. या पद्धतीत अनेक त्रुटी असाव्यात म्हणून बुफे नावाचा प्रघात सुरू झाला.
पंगतीत बसल्यावर अनेकदा तटावर कोण बसले आहे, याचा विचार न करता अगदी सहा-आठ वर्षांचे मूल असले, तरीही मोठ्यांना वाढतात तितक्या प्रमाणात पदार्थ वाढले जात असत आणि स्वाभाविकपणे या मुलांना तितके जेवण जास्त झाल्याने अर्ध्याहून अधिक पानात सोडून देऊन अन्न वाया जाई.

काही कुशल व व्यवहारी वाढपी मात्र व्यक्ती पाहून वाढताना पाहिले आहेत, तसेच अनेक जेवणारे वाढायला येणाºयाला सुरुवातीलाच नको म्हणत किंवा अगदी थोडे वाढायला सांगत, हा सर्व अन्नावर असलेल्या आदराचे प्रतीक आहे, पण असे म्हणणारे थोडेच, बाकीचे कितीही वाढा, मला जेवढे खायचे ते खाऊन उरलेले तसेच पानात सोडून उठणार या श्रेणीतील.
बुफे पद्धतीचा जन्म याच बेफिकीर, अन्नद्रोही वृत्तीच्या लोकांच्यामुळे झाला असावा. पंगतीत अन्न तुमच्याकडे येते म्हणून तुम्हाला त्याची किंमत नव्हती. बुफेमध्ये तुम्ही अन्नाकडे जाता, जिथे तुम्हाला आवडतील तेच पदार्थ तुम्ही ताटात वाढून घ्याल, हे भोळीभाभडी अपेक्षा. पण म्हणतात ना! ह्यफुकट चंदन मिळाले, तर लोक मंजन म्हणून देखील वापर करतातह्ण, अगदी तसेच येथे लागू होते.

सुरुवातीलाच सर्व पदार्थ एक घासा इतकेच घेऊन आवडल्यास दुसºयांदा घेण्याला काय हरकत आहे? असे केल्याने अनाठायी वाढून घेतलेले अन्न वाया जाणार नाही.
आज आपल्या देशात जितके अन्न पिकवले जाते, त्यातील किमान २५% अन्न कोणत्या न कोणत्या कारणामुळे वाया जात आहे.

सुरुवात आपण शेतामधून करूया. शेतकरी जर १००० पोती धान्य पिकवत असेल, तर बाजारात येईपर्यंत त्यातील किमान २ पोती धान्य हे वेगवेगळ्या कारणांमुळे जसे की, पोत्यांच्या असलेल्या छिद्रातून गळते व रस्त्यावर सांडते, याचे प्रात्यक्षिक पाहायचे असल्यास अडत धान्य बाजारात दिसून येईल. हमाल गाडीतून धान्य पोती उतरवताना त्यांना हूक लावतात, ज्यामुळे त्यातून धान्य गळती सुरू होते.
आता पुढे, धान्य गोडाऊनमध्ये रचून ठेवले जाते येथे विविध जीवजंतू आपला हक्क बजावतात, त्यात उंदरांचा वाटा प्रमुख असतो, याशिवाय कीड लागून नासाडी होतेच, यात अंदाजे तीन-चार पोती धान्य वाया जाते. पावसामुळे मात्र खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते, यात पावसाला दोष देण्यापेक्षा आपल्या व्यवस्थेला दोष देणे जास्त संयुक्तिक राहील. अडत बाजारात, जिथे धान्याचा लिलाव होतो तिथे हे धान्य काळजीपूर्वक साठवण्याची तसदी लिलाव करणारा घेत नाही, यामुळे या नुकसानीचा बोजा शेतकºयावरच पडतो. यात अंदाजे २० पोती धान्य नक्की वाया जाते.

तांदूळ व डाळ यांना शेतातून मिलमध्ये घेऊन जातात, तेथेही पाण्यात भिजल्यामुळे मोड येऊन धान्याचे नुकसान होत असते. मी विमा सर्वेअर असल्यामुळे या मिलमधील नुकसानीची मोजदाद करण्याची संधी मला वेळोवेळी मिळाली. त्यातून ही आकडेवारी आपल्या समोर ठेऊ शकलो. यात मिल मालकाचे पैशांच्या रूपात काहीच नुकसान होत नाही, विमा कंपनी सर्व नुकसान देते, म्हणजे जे काही नुकसान होते ते वस्तूच्या रूपात झालेले असते, त्याची किंमत तो उरलेल्या मालाची किंमत वाढवून वसूल करतोच. इथून हे धान्य किराणा दुकानात येते, येथेही काही प्रमाणात धान्य विविध कारणामुळे वाया जाते, त्यातील उंदीर हे प्रमुख कारण आहे.
सहसा घरात वापरणाºया धान्याची नासाडी होत नाही, कारण आपण घाम गाळून पैसा मिळवतो, त्याची दखल घरातील वडीलधारी मंडळी घेऊन मुलांवर संस्काराच्या रूपात ताटातील शीतसुद्धा वाया न घालवू देता अंमलात आणतात.

घरात काटेकोर राहणारी मंडळी जेव्हा सार्वजनिक समारंभात जातात, तिथे मात्र बुद्धी गहाण टाकतात, आधाश्यासारखे ताटात दिसेल ते वाढून घेतात आणि त्यातील न आवडलेले पदार्थ निलाजरेपणे टाकून देतात. लहान मुलांना तर काही धरबंध नसतोच, वडीलधारी मंडळीचा वचक येथे असून नसल्यासारखा असतो, किंबहुना त्यातील बºयाच लोकांना खिशातील पैसे खर्च होत नाहीत ना मग अशी उधळपट्टी चालते. बहुतेक वेळेस मुलांनी घेतलेले अर्ध्याहून अधिक पदार्थ टाकून दिले जातात. वास्तविक, मुलांचे उरलेले अन्न त्यांच्या आई-वडिलांनी खायला काही हरकत नसते, पण एटिकेट आडवे येतात आणि माजोरी वृत्ती आपला ठसा उमटवून जाते. याच समारंभाच्या बाहेर भिकारी उपाशीपोटी काहीतरी मिळेल या आशेने समारंभाकडे आशाळभूत नजरेने पाहत असतात.
आमच्या लहानपणी घरचे मोठे लोक म्हणत ह्यखाऊन माजावे पण टाकून माजू नयेह्ण, हे आजकाल या टाकलेल्या अन्नाकडे पाहिल्यावर वारंवार आठवते.

– विजय लिमये /9326040204\\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …