ठळक बातम्या

अनिल देशमुख यांना झटका – पुन्हा ईडी कोठडीत रवानगी होणार

उच्च न्यायालयाने ठरवला सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द

मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आता आणखी एक झटका बसला आहे. शनिवारी सत्र न्यायालयाने अनिल देशमुख यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या निर्णयाला ईडीने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांची पुन्हा ईडी कोठडीत रवानगी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना १२ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.
अनिल देशमुख यांची अद्याप चौकशी करायची असल्याने ईडी कोठडी मिळावी, अशी मागणी करत ईडीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ईडीने केलेल्या या मागणीवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना १२ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

शनिवारी अनिल देशमुख यांना सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. अनिल देशमुख यांना १ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा ईडीने अटक केली होती. त्यानंतर २ नोव्हेंबर रोजी न्यायालयाने त्यांना ६ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. त्यानंतर शनिवारी पुन्हा कोठडी संपल्याने न्यायालयात हजर केले असता, त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
१०० कोटी वसुली आणि मनी लाँड्रिंगप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली. १२ तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटकेची कारवाई केली होती. या कारवाईमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. १०० कोटी वसुलीप्रकरणी आरोप असलेले अनिल देशमुख अनेक दिवसांपासून गायब होते. अनिल देशमुख यांना ५ वेळा समन्स बजावल्यानंतरही ईडीसमोर हजर राहिले नव्हते. त्यामुळे त्यांना लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आले होते, तसेच देशमुख यांचा शोध घेण्यासाठी ईडीकडून सीबीआयकडे मदत मागण्यात आली होती. अखेर १ नोव्हेंबर रोजी अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले. सकाळी ११ वाजेच्या सुमारास अनिल देशमुख ईडी कार्यालयात पोहोचले होते. त्यानंतर जवळपास १२ तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली होती.

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

One comment