मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीने १२ आयपीएस आणि मपोसे अधिकाऱ्यांची चौकशी केली. पोलीस दलातील बदली प्रकरणात ईडीने ही चौकशी केली आहे. गेल्या आठवड्याभरात ही चौकशी केली आहे. १२ पैकी काही अधिकारी आयपीएस आहेत, तर काही अधिकारी महाराष्ट्र पोलीस सेवेतील आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीने मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला आहे.
ईडीकडून अनिल देशमुख यांची दोन मुद्यांवर चौकशी सुरू आहे. एक मुद्दा बार मालकाकडून १०० कोटी रुपये उकळण्याबाबतचा आहे, तर दुसरा मुद्दा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्याचा आहे. बार मालकांकडून ४ कोटी २० लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. यामुळे ईडीने अनिल देशमुख यांना अटक केली, तसेच त्यांची मालमत्ताही जप्त केली आहे.
तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यात कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाला आहे. बदलीच्या माध्यमातून मिळालेले पैसे हे मनी लाँडरिंग केल्याचा ईडीच्या अधिकाऱ्यांना संशय आहे, मात्र त्यांना अधिकाऱ्यांची यादी उपलब्ध होत नव्हती. अखेर सांगली येथून एका व्यक्तीला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे पोलीस उपायुक्त दर्जाच्या आयपीएस आणि मपोसे अधिकाऱ्यांच्या नावांची यादी सापडली होती. ही यादी बदल्या बाबतची होती. त्या यादीमध्ये असलेल्या १२ आयपीएस आणि मपोसे अधिकाऱ्यांना बोलावून त्याचे जबाब गेल्या काही दिवसात नोंदवले आहेत. ईडीला अनिल देशमुख यांच्या विरोधातील तपास लवकरच संपवायचा आहे. त्या अनुषंगाने या आयपीएस आणि मपोसे अधिकाऱ्यांचा जबाब तात्काळ घेण्यात आला आहे. या चौकशीतून बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे निष्पन्न झाल्यास अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.